शुक्रवारी रात्री ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन रेल्वे गाड्यांची धडक झाल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भात सखोल चौकशी केली जात असतानाच पुन्हा एकदा ओडिशामध्ये आणखीन एक रेल्वे अपघात झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर ७२ तासांच्या आत हा दुसरा अपघात घडल्यामुळे रेल्वे सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
नेमकं काय घडलं?
बालासोर तिहेरी रेल्वे अपघाताला तीन दिवसही उलटत नाहीत, तोच आज सकाळी पुन्हा एकदा ओडिशामध्ये एक मालगाडी रुळावरून घसरली आहे. बालासोरमधील घटनास्थळापासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बारगढमध्ये हा अपघात झाला असून चुनखडी वाहून नेणाऱ्या एका मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरले. डुंगरी भागात असणाऱ्या चुनखडीच्या खाणींपासून ते एसीसी बारगढ सिमेंट प्लांटच्या दरम्यानच्या भागात रेल्वेचा एक खासगी अरुंद ट्रॅक आहे. ही लाईन आणि यावरची वाहतूक यांचा भारतीय रेल्वे विभागाशी कोणताही संबंध नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जीवितहानी नाही
दरम्यान, या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं माहिती देण्यात आली आहे. मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरले असून तिथे किरकोळ दुरुस्ती कामानंतर पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यात येत असल्याचंही समोर आलं आहे.
बालासोरमध्ये काय घडलं?
शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास बालासोरमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये सुमारे २८८ प्रवाशांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. शेकडो प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार केले जात आहेत. ४८ तासांनंतर रविवारी रात्री या मार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू झाली.