कोरोमंडल एक्स्प्रेसने सुट्टीवर जाणाऱ्या NDRF च्या जवानाने अपघाताचा सर्वात पहिला अलर्ट पाठवला होता. त्यानंतर हा जवना ट्रेन अपघातानंतर मदत आणि बचावकार्यातही सहभागी झाला होता. एनडीआरएफचे जवान व्यंकटेश एन. के. असं त्यांचं नाव आहे. ते पश्चिम बंगालच्या हावडा या ठिकाणाहून तामिळनाडूला चालले होते. शुक्रवारी शालीमार चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि दुसऱ्या एक्स्प्रेसचा अपघात झाला. मालगाडीही त्यांना धडकली. या अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. ट्रॅकवर ट्रेनचे डबे पसरले त्यामुळे एकच हलकल्लोळ उडाला. दोन ट्रेन घसरल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी जखमीही झाले. या दोन्ही ट्रेन्समध्ये ३५०० प्रवासी प्रवास करत होते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की या अपघातातून व्यंकटेश एन. के. हे थोडक्यात बचावले. कारण ते ज्या कोचमध्ये बसले होते तो कोच क्रमांक बी ७ हा डबा घसरला होता. मात्र तो पुढच्या डब्यांना जाऊन धडकला नाही.
व्यंकटेश यांनी नेमकं काय सांगितलं?
कोलकाता एनडीआरएफच्या दुसऱ्या बटालियनमध्ये तैनात असलेले ३९ वर्षीय व्यंकेटेश यांनी सर्वात आधी आपल्या बटालियनमध्ये फोन करुन वरिष्ठ निरीक्षकांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर व्हॉट्स अॅपवर लाइव्ह लोकेशन पाठवलं. त्याचा उपयोग बचाव करणाऱ्या पथकाला लोकेशन शोधण्यासाठी झाला. मला एक जोराचा झटका बसला आणि त्यानंतर मी डब्यातल्या काही प्रवाशांना पडताना पाहिलं. मी एका प्रवाशाला बाहेर काढलं आणि रेल्वे ट्रॅकजवळच्या दुकानाजवळ बसवलं त्यानंतर इतरांची मदत करायला धावलो असंही त्यांनी सांगितलं आहे. अपघात झाल्यानंतर मेडिकल चालवणारा एक माणूस आणि इतर स्थानिक लोक मदतीला धावले. त्यांनी अनेकांना मदत केली असंही व्यंकटेश यांनी सांगितलं.
व्यंकटेशही सहभागी झाले बचावकार्यात
भुवनेश्वरपासून जवळपास १७० किमी अंतरावर असलेल्या बहनागा बाजार स्टेशनजवळ हा भीषण अपघात झाला. एका अधिकाऱ्याने असं सांगितलं की एनडीआरएफ व्यंकटेश कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होते. सुट्टी घेऊन ते तामिळनाडूला आपल्या घरी निघाले होते. मात्र अपघात होताच त्यांनी आपल्या वरिष्ठांना फोन केला. हा पहिला फोन होता आणि त्यानंतर एनडीआरएफ अलर्ट झालं आणि घटनास्थळी पोहचलं. इंडिया टुडेने याविषयीचं वृत्त दिलं आहे. सीमा सुरक्षा दलातून २०२१ मध्ये एननडीआरएफमध्ये आले. त्यांनी सुट्टीवर जात आहोत हे विसरुन कर्तव्याला महत्त्व दिलं. त्यांनी या अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतही केली. मोबाईल फोनच्या टॉर्चचा वापर करुन गुडूप अंधारातून त्यांनी प्रवाशांना वाचवलं. दिल्ली एनडीआरएफचे डीआयजी मोहसेन शाहिदी यांनी म्हटलं आहे की एनडीआरएफचा जवान कायमच ड्युटीवर असतो. तो गणवेशात असो किंवा नसो. तसंच त्यांनी व्यंकटेश यांच्या कृतीचं कौतुकही केलं आहे.