Kamakhya Express Accident : ओडिशा राज्यात पुन्हा एकदा एका रेल्वेचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याची माहिती सांगितली जात आहे. ओडिशातील कटकजवळील नेरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ बेंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले आहेत. रविवारी सकाळी ११.५४ वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. ही घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच प्रशासनाकडून मदतकार्य सुरु करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. या घटनेनंतर अपघात मदत आणि वैद्यकीय मदत रेल्वे देखील घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याच्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच कामाख्या एक्स्प्रेस रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे अनेक एक्स्प्रेसचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कामाख्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कामाख्या एक्स्प्रेस पुन्हा धावण्यासाठी योग्य दुरुस्तीचं काम सुरू असल्याचंही ईसीओआर अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

रेल्वे प्रशासनाने काय माहिती दिली?

या घटनेबाबत ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, “आम्हाला कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. ११ एसी डबे रुळावरून घसरले आहेत. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आम्हाला माहिती मिळाल्यानुसार, अपघात निवारण गाड्या, आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे पाठवण्यात आली आहेत. या बरोबरच जीएम/ईसीओआर आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच या अपघाताचे कारण चौकशीनंतर समोर येईल. त्या मार्गावर थांबलेल्या गाड्या वळवणे आणि पूर्ववत काम सुरू करणे हे आमचं पहिलं प्राधान्य आहे.”

ओडिशात याआधीही घडले होते रेल्वे अपघात

ओडिशा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी याआधीही काही रेल्वे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी भुवनेश्वरजवळ मालगाडी रुळावरून घसरली होती. पण त्या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नव्हाती. तसेच ओडिशात २०२३ मध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला होता. तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या. यामध्ये शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडीचा समावेश होता. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता.