नवी दिल्ली : सीबीआयने मंगळवारी बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला. या अपघातामागे रेल्वेचा निष्काळजीपणा कारणीभूत होता की बाह्य घटकांनी केलेला घातपात याचा तपास सीबीआयद्वारे केला जाणार आहे. या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला असून १,१०० पेक्षा जास्त जण जखमी झाले.
सीबीआय आतापर्यंत कधी रेल्वे अपघाताची चौकशी केली नव्हती. अपघातानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात गाडय़ांची उपस्थिती दर्शवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे आढळले होते. त्यामुळे या अपघातामागे घातपात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सीबीआयच्या १० सदस्यांच्या पथकाने मंगळवारी प्रत्यक्ष माहिती संकलित करायला सुरुवात केली. या पथकाने रेल्वे रुळांची तपासणी केली, सिग्नल कक्षाची पाहणी केली आणि बहनागा बाजार रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पथकाबरोबरच्या न्यायवैद्यक तपासणी पथकानेही सिग्नल कक्षातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी निरनिराळय़ा उपकरणांचे कामकाज जाणून घेतले.
‘अपघातामागे तृणमूलचा हात’
या अपघातामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप पश्चिम बंगालमधील भाजपानेते सुवेंदू अधिकारी यांनी केला. अपघात दुसऱ्या राज्यात झाला असताना तृणमूलचे नेते अस्वस्थ का आहेत, असे ते म्हणाले.
अर्थसंकल्पावरून मोईली यांची टीका रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये एकत्रित करणे ही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची घोडचूक आहे, अशी टीका वरिष्ठ काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी मंगळवारी केली. रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्याची पद्धत २०१७ पासून बंद आहे, ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी मोईली यांनी केली. रेल्वेच्या मूलभूत दुरुस्त्या केल्या जात नसताना ते बुलेट ट्रेनबद्दल बोलत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.