Odisha Victim : ओडिशातील पोलिसांनी लष्कराच्या जवानाला मारहाण केली त्यानंतर त्याच्या होणाऱ्या पत्नीचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. १४ सप्टेंबर या दिवशी भुवनेश्वर या ठिकाणी असलेल्या एका पोलीस ठाण्यातच ही घटना घडली. या प्रकरणात पाच पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये एका पोलीस निरीक्षकासह दोन महिला पोलिसांचा समावेश आहे. या घटनेनंतर पीडितेने माध्यमांसमोर येऊन तिच्याबरोबर नेमकं काय घडलं त्याचं धक्कादायक वर्णन केलं आहे.

काय म्हटलं आहे पीडितेने?

“साधारण रात्रीचा एक वाजला होता. मी माझं रेस्तराँ बंद करुन घरी चालले होते. माझ्याबरोबर माझा होणारा नवराही होता. त्यावेळी काही टवाळखोरांनी आमची कार रोखली आणि हुज्जत घालू लागले. मी आणि माझा होणारा नवरा यातून कसेबसे वाचलो आणि या प्रकरणाची दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो. त्यावेळी महिला कॉन्स्टेबल गाऊन घालून रिसेप्शनला बसली होती. मी जेव्हा तिच्याकडे मदत मागितली आणि काय प्रकार घडला ते सांगितलं तेव्हा तिने माझ्याशीच उद्धटपणा करायला सुरुवात केली.”

दोन महिलांनी मला मारहाण केली

पीडितेने पुढे सांगितलं, “मी जेव्हा हे सांगितलं की मी एक वकील आहे आणि गुन्हा नोंद करुन घेणं ही तुमची पोलीस म्हणून ड्युटी आहे, तेव्हा ती महिला पोलीस कर्मचारी माझ्यावरच चिडली. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लॉक अपमध्ये टाकण्यात आलं. मी सांगितलं तो लष्करी अधिकारी आहे त्याला तुम्ही असं लॉक अपमध्ये बंद ठेवू शकत नाही. त्यावेळी दोन महिला पोलीस कर्मचारी आल्या आणि त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. माझे केस ओढले आणि मला फरफटत नेलं.”

हे पण वाचा- Priyanka Gandhi : ओडिशातील ‘त्या’ घटनेवरून राहुल गांधींसह प्रियांका गांधींचं भाजपा सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “यांचं सरकार पोलिसांना…”

पोलीस निरीक्षकाने केलं लैंगिक शोषण

यानंतर पीडिता म्हणाली, त्या दोन महिला पोलिसांनी माझं जॅकेट काढलं आणि माझे हात बांधले. माझी ओढणी घेतली आणि माझे पायही बांधले आणि मला एका खोलीत बंद केलं. त्यानंतर काही वेळाने एक पोलीस निरीक्षक आला. त्याने माझी अंतर्वस्त्रं काढली आणि माझ्या प्रायव्हेट पार्टवर मला मारु लागला. माझं लैंगिक शोषण करण्यात आलं. सकाळी सहा वाजता पुन्हा पोलीस अधिकारी तिथे आला. त्याच्यासह एक महिलाही होती त्यानेही माझी अंतर्वस्त्रं खेचली आणि स्वतःचा प्रायव्हेट पार्ट दाखवत माझ्याशी अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलणं सुरु केलं. हे सगळं सांगताना महिलेला अश्रू अनावर झाले होते.

पीडित महिला रुग्णालयात होती

महिलेची प्रकृती बिघडल्याने सकाळी तिला भुवनेश्वर एम्समध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिलेने माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी तिने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारही दाखल केली. याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही महिलेने सांगितले.