तेल संपन्न असलेले देश किंवा रशियामधून तेलाची आयात करणारे देश प्रतिबंधात्मक व्यापाराचे समर्थन करू शकत नाहीत. त्यामुळे भारताला तेलाच्या आयातीसंदर्भात या देशांनी सल्ला देऊ नये आणि भारताच्या इंधन व्यवहारांचे राजकारण केले जाऊ नये, असं म्हणत भारताने शुक्रवारी पश्चिमी देशांना खडे बोल सुनावले आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) या देशातील सर्वोच्च तेल कंपनीने रशियाकडून ३ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. यासाठी रशियाने आंतरराष्ट्रीय दरांवर मोठी सवलत देऊ केली होती. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतरची भारताने व्यापार्यामार्फत केलेली पहिलीच खरेदी आहे. आक्रमणानंतर पुतिन प्रशासनाला एकटे पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला होता.
कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅलर १०६ डॉलरवर
फायनान्शिअल टाईम्सने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, मार्चमध्ये तिसरा सर्वात मोठा इंधन ग्राहक असलेल्या भारतातील रशियन तेलाची निर्यात चौपट झाली आहे. रशियाने आतापर्यंत केवळ मार्चमध्ये भारताला दररोज ३६०,००० बॅरल तेल निर्यात केले आहे, जे २०२१ च्या सरासरीच्या जवळपास चार पट आहे. केप्लरच्या अहवालात कमोडिटी डेटा आणि अॅनालिटिक्स फर्मचा हवाला देत म्हटलंय की, रशिया सध्याच्या शिपमेंट शेड्यूलच्या आधारावर संपूर्ण महिन्यासाठी दिवसाला २०३,००० बॅरल्स तेलाची निर्यात करण्याच्या मार्गावर आहे.
दिल्लीतील सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “तेलसंपन्न असलेले देश किंवा रशियाकडून आयात करणारे देश प्रतिबंधात्मक व्यापाराचे समर्थन करू शकत नाहीत. त्यामुळे भारतातील इंधनाच्या व्यवहारांचे राजकारण केले जाऊ नये. भारत आपल्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर जास्त अवलंबून आहे. आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास ८५ टक्के तेलाची आयात करावी लागते.”
भारतात सर्वाधिक आयात पश्चिम आशियातील इराक २३%, सौदी अरेबिया १८%, UAE ११% या देशांमधून होते. अमेरिका आता भारतासाठी कच्च्या तेलाचा महत्त्वाचा स्रोत बनला असून ७.३ टक्के आयात तिथून होत आहे. परंतु, चालू वर्षात ही आयात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून ती टक्केवारी कदाचित ११ टक्के असेल आणि त्याची बाजारातील भागीदारी ८ टक्के असेल.
“सध्याची परिस्थिती पाहता भारताला स्पर्धात्मक इंधन स्रोतांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आम्ही सर्व उत्पादकांकडून अशा ऑफरचे स्वागत करतो. भारतीय व्यापारी देखील सर्वोत्तम पर्याय शोधण्यासाठी जागतिक इंधन बाजारात काम करतात,” असे सूत्राने सांगितले.
गुरुवारी, भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची खरेदी करण्याची शक्यता नाकारली नाही. कारण तेलाचा प्रमुख आयातदार म्हणून प्रत्येक वेळी सर्व पर्यायांचा विचार करावा लागतो, असं भारतानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “भारत आपल्या तेलाच्या बहुतांश गरजा आयातीतून भागवतो. त्यामुळे आम्ही नेहमी जागतिक इंधन बाजारातील सर्व शक्यतांचा शोध घेत असतो. रशिया भारतासाठी कच्च्या तेलाचा प्रमुख पुरवठादार नाही. सध्याच्या परिस्थितीत अनेक युरोपियन देश रशियाकडून तेलाची आयात करत आहेत,” असंही बागची यांनी सांगितलं.