Oil Tanker Capsized in Oman : ओमानच्या समुद्रकिनाऱ्यालगत एक तेलवाहू जहाज बुडाल्याची बातमी समोर येत आहे. या जहाजावर १३ भारतीय आणि ३ श्रीलंकन नागरिक असे १६ कर्मचारी होते. सोमवारी (१५ जुलै) जहाज बुडाल्याची घटना घडली असून तेव्हापासून हे सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी (१६ जुलै) याबाबतची बातमी दिली. सुरक्षा केंद्राने सांगितले की, प्रेस्टीज फाल्कन नावाचे तेलवाहू जहाज दुबईच्या बंदरावरून निघाले होते. ओमानमधील येमेन ऐडन बंदराकडे येत असताना हा अपघात घडला. डुकम या ओमानमधील आणखी एका बंदराजवळ असलेल्या रास मद्राकाच्या शहरापासून आग्नेय दिशेला २५ सागरी मैल अंतरावर हे जहाज बुडाले. दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे.

ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने रॉयटर्स वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, तेलवाहू जहाज बुडाल्यामुळे ते समुद्रावर उलटे तरंगत होते. तथापि, जहाज पुन्हा सरळ केले गेले की नाही किंवा त्यातून तेलगळती झाली की नाही? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

सदर जहाज २००७ मध्ये बांधलेले असून ११७ मीटर लांबीचे असल्याचे सांगितले जाते. कमी अंतरावर प्रवास करण्यासाठी हे छोटे जहाज वापरले जात असल्याची माहिती LSEG या सागरी व्यापाराशी संबंधित असलेल्या डेटा विश्लेषण संकेतस्थळाने दिली.

ज्या डक्म बंदराजवळ ही दुर्घटना घडली ते ओमानच्या नैऋत्य दिशेला वसलेले आहे. ओमानच्या तेल आणि वायू खाण प्रकल्पांचे ते प्रमुख केंद्र आहे. याठिकाणी तेलशुद्धीकरणाचे मोठ-मोठे प्रकल्प असल्यामुळे ओमानच्या औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने या शहराचे महत्त्व अधिक आहे.

Story img Loader