बंगळुरुमध्ये एका २२ वर्षीय तरुणीने ओला टॅक्सी चालकावर अत्यंत गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे. टॅक्सी चालकाने आपल्यासमोर अश्लील कृती केली असे या तरुणीने म्हटले आहे. मी टॅक्सीमध्ये मागच्या सीटवर बसलेली असताना चालक त्याच्या मोबाइलवर पॉर्न व्हिडिओ पाहून हस्तमैथुन करत होता असा आरोप या तरुणीने केला आहे. गुरुवारी सकाळी या तरुणीने येलाहंका येथून जेपी नगर येथे जाण्यासाठी ओला टॅक्सी बुक केली होती.
महिलेच्या तक्रारीवरुन क्युबबॉन पार्क पोलिसांनी आरोपी विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. देवासामोलिया असे या चालकाचे नाव आहे. जेपी नगर येथे जाण्यासाठी महिला सकाळी साडेसहाच्या सुमारास टॅक्सीत बसली. टॅक्सी क्वीन्स सर्कल येथे पोहोचली तेव्हा ड्रायव्हर आरशातून तिच्याकडे एकटक पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने त्याच्या डाव्या हातात मोबाइल पकडला होता व त्यावर तो पॉर्न व्हिडिओ पाहत होता. त्यानंतर त्या चालकाने हस्तमैथुनही केला असा आरोप तरुणीने केला आहे.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर आपण त्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली पण तो ऐकला नाही. ठरलेल्या ठिकाणी त्याने टॅक्सी थांबवली असे या तरुणीने सांगितले. ओलाच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्याने आरोपी चालक आता आपल्या सेवेमध्ये नसून आपण ग्राहकासोबत आहोत. पोलिसांना तपासात सर्व सहकार्य करु असे सांगितले.