Ola Uber React to govt notices : ग्राहक कोणत्या कंपनीचा फोन वापरतो यावरून कॅबचे भाडे ठरवले जात नाही असे स्पष्टीकरण कॅब अॅग्रिगेटर ओला आणि उबर यांनी शुक्रवारी दिले आहे. केंद्र सरकारने भाडे आकारण्याच्या मुद्द्यावर या कंपन्यांना नोटीस पाठवली होती, ज्यामध्ये कोणत्या प्रकारच्या फोनवरून कॅब बुक केली आहे त्यावरून त्याचे भाडे वेगवेगळे दाखवले जात असल्याच्या तक्रारीवर स्पष्टीकरण मागण्यात आले होते. दरम्यान या कंपन्यांनी ही चुकीची समजूत दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

ग्राहक आयफोन वापरत आहेत की Android डिव्हाइस यावरून ओला (Ola) आणि उबर (Uber) या कंपन्या एकाच सेवेसाठी वेगवेगळे भाडे आकारत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) याची दखल घेत, याविरोधात कारवाई केली होती.

त्यानंतर ओलाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितले की, “आमच्याकडे सर्व ग्राहकांना एकाच पद्धतीची भाडे आकरण्याची यंत्रणा आहे आणि आम्ही सारख्याच सेवेसाठी ग्राहकांच्या मोबाईल फोनमधील ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारावर फरक करत नाही. आम्ही सीसीपीएला आज हेच स्पष्टीकरण दिले आहे आणि आम्ही याबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्याबरोबर मिळून काम करू”.

उबरच्या प्रवक्त्याने निवेदनात सांगितेल की, “आम्ही ग्राहकाचा फोन कोणत्या कंपनीचा आहे या आधारावर भाडे ठरवत नाही. याबद्दल असलेला कोणताही गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही सीसीपीएबरोबर मिळून काम करू”. या संपूर्ण प्रकरणावर आयफोन निर्माती कंपनी अॅपल किंवा अँडड्रॉइडची मूळ कंपनी गूगलने अद्याप कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ग्राहक तक्रार निवारण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरूवारी सीसीपीएने दोन कंपन्यांना नोटीस पाठवली असल्याची माहिती दिली होती. तसेच फूड डिलीव्हरी आणि ऑनलाइन तिकीट विक्री करणारे पोर्टल यासह इतर क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या किंमतीसंबंधी धोरणांचा देखील विचार करण्यासाठी ते सीसीपीएला निर्देश देतील असेही जोशी म्हणाले होते. गेल्या महिन्यात जोशी यांनी वेगवेगळ्या किंमती आकारण्याच्या पद्धतीला व्यापार करण्याची चुकीची पद्धत असल्याचे म्हटले होते.

दिल्लीतील एका उद्योजकाने एक्सवर एक पोस्ट करत दोन्ही कंपन्यांच्या अॅपमधून एकाच ठिकाणासाठी बुक केलेल्या कॅबला, वेगवेगळ्या फोनवर वेगळ्या किमती दाखवत असल्याचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली होती.

Story img Loader