भारताचं इशान्येकडील राज्य मणिपूर गेल्या अडीच महिन्यांपासून धगधगतंय. राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू आहे. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायामध्ये सुरू असलेल्या तंट्यामुळे हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. मागील अनेक दिवसांपासून या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परंतु, सरकारला त्यात अद्याप म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. या गंभीर परिस्थितीत मणिपूरमधील नागरिक केंद्र सरकारकडे आशेने पाहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मणिपूरमधील परिस्थिती पाहून ऑलिम्पिक पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मणिपूरकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. मीराबाईने एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केला आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आता तीन महिने होत आले आहेत. या संघर्षामुळे तिथल्या अनेक खेळाडूंना प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होता येत नाहीये. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम झाला आहे. मुलांना शाळेत जाता येत नाहीये, त्यामुळे तिथला संघर्ष थांबवा.

मीराबाईने म्हटलं आहे की, मणिपूरमधल्या संघर्षात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. समाजकंटकांनी लोकांची घरं जाळली आहेत. माझंही मणिपूरमध्ये घर आहे. मी आत्ता तिथे नाही, कारण मी सध्या अमेरिकेत असून आगामी जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी करत आहे. मी मणिपूरमध्ये नसले तरी तिथला संघर्ष कधी संपणार याचाच विचार करत असते. मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करते की मणिपूरमध्ये जी लढाई सुरू आहे ती लवकरात लवकर थांबवा. मणिपूर हे माझं घर आहे, माझं हे घर वाचवा, मणिपूरवासियांना वाचवा, तिथे शांतता निर्माण करा.

हे ही वाचा >> ‘त्या’ व्हिडिओवर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांना केली विनंती…

मणिपूरमध्ये आतापर्यंत १३० लोकांचा मृत्यू

मणिपूरमधील हिंसाचारामध्ये आतापर्यंत १३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे; तर साधारण ३,००० लोक या हिंसाचारात जखमी झाले आहेत. ३ मे रोजी या हिंसाचारास सुरुवात झाली होती. आतापर्यंत १२ हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympic medallist mirabai chanu appeals to pm modi amit shah to end conflict in manipur asc
Show comments