Vishal Patil Parliament Speech : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांचं हॅटट्रिक करण्याचं स्वप्न अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भंग केलं. विशाल पाटलांनी एक लाखाहून अधिक मताधिक्याने संजयकाकांचा पराभव केला. काँग्रेसशी बंडखोरी करत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात (चंद्रहार पाटील – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष विशाल पाटलांवर कारवाई करण्याच्या तयारीत होता. मात्र विशाल पाटलांनी ही निवडणूक जिंकून सर्वांची तोंडं बंद केली.
निवडून आल्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ते संसदेत आता सरकाविरोधात शड्डू ठोकून उभे राहिल्याचं पाहायला मिळतं. मात्र १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विशाल पाटलांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशाल पाटील विरोधी बाकावरील खासदार असले तरी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विशाल पाटलांना म्हणाले, “तुम्ही विरोधक नाही, तुम्ही तर अपक्ष खासदार आहात.” त्यावर विशाल पाटील हसून म्हणाले, “मी अपक्ष खासदार आहे. पण विरोधी बाकावर बसलोय.”
संसदेत काय घडलं?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधवेशनात गेले काही दिवस अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे. विरोधी पक्षांमधील खासदार अर्थसंकल्पातील उणिवांवर भाष्य करत आहेत, तर सरकारमधील मंत्री त्यावर उत्तरं देत आहेत. अशातच ३१ जुलै रोजी लोकसभेचं कामकाज रात्री १० वाजेपर्यंत चाललं. या दिवशी अपक्ष खासदार विशाल पाटील यांना दोन वेळा सभागृहात बोलण्याची संधी मिळाली. यावेळी विशाल पाटील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्देशून म्हणाले, मी विरोधी पक्षातील खासदार असूनही तुम्ही मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. यावर ओम बिर्ला म्हणाले, “तुम्ही विरोधी पक्षात थोडी आहात, तुम्ही तर अपक्ष खासदार आहात.” यावर विशाल पाटील, म्हणाले, “मी विरोधी बाकावर बसलोय, मला माहिती नाही तुम्ही कुठे बसवाल.”
हे ही वाचा >> भूस्खलनातील मृतांचा आकडा १६७; १९१ बेपत्ता, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
खासदार विशाल पाटील म्हणाले, “मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. मला रेल्वेचा मुद्दा इथे मांडायचा आहे. असं म्हटलं जातं की एखाद्या देशाचा विकास समजून घ्यायचा असेल तर त्या देशातील रेल्वेचं परीक्षण करणं गरजेचं असतं. भारतात रेल्वे विभाग खूप मोठा आहे. भारतीय रेल्वे देशात सर्वाधिक नोकऱ्या देणारी संस्था आहे. केवळ रोजगारच नव्हे तर आपली रेल्वे रोजगाराच्या आणि उद्योगाच्या काही अप्रत्यक्ष संधी देखील देत असते. आपल्याकडे रेल्वे व्यापार करण्यासाठी महत्त्वाचं साधन मानली जाते. रेल्वे केवळ दळणवळणाचं साधन नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग आहे. परंतु, अलीकडच्या काळात भारतात रेल्वे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे अपघात कमी करण्यासाठी आपलं सरकार फार काही करताना, उचित पावलं उचलताना दिसत दिसत नाही. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी फार काही तरतुदी दिसल्या नाहीत.”