आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची स्पष्टोक्ती, सूर्यनमस्कारही वगळले
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजे २१ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सूर्यनमस्कार आसनांचा समावेशच असणार नाही व ओंकाराची सक्ती केली जाणार नाही, असे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. खरेतर योगसाधनेत सूर्यनमस्कार व ओम नसेल तर ती अपूर्ण ठरते असे असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदाच्या योगदिनानिमित्तही कोटय़वधी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे. सूर्यनमस्कार आसन गेल्यावर्षीही समाविष्ट केले नव्हते कारण ते गुंतागुंतीचे आहे. ४५ मिनिटांत ते करणे शक्य नाही कारण अनेकांना ते नवीन असू शकते, त्यामुळे सूर्यनमस्कारांना वगळले आहे, असे नाईक यांनी सांगितले. मुस्लिम समुदायाने सूर्यनमस्कार आसनाला विरोध केला होता कारण सूर्यनमस्कार त्यांच्या धार्मिकतेत बसत नाहीत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंडीगड येथील योग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओमच्या उच्चारणाबाबत वाद असल्याचा इन्कार करून ते म्हणाले की, ओंकार सक्तीचा नाही. जेव्हा काही चांगले काम केले जाते तेव्हा त्याला विरोध होतोच. यावेळी ओंकाराला विरोध नाही पण तरी आम्ही तो सक्तीचा ठेवलेला नाही. हे खरे असले तरी ओंकाराशिवाय योगाला पूर्णत्व येत नाही. मुस्लिमांनी ओंकारास विरोध केला होता.
विद्यापीठे व महाविद्यालयांनी योग दिनी संस्कृत श्लोक पठण करावे तसेच आयुष मंत्रालयाने दिलेले नियम पाळावेत असे फर्मान विद्यापीठ अनुदान आयोगाने काढले आहे. सरकारने मात्र ओंकाराची सक्ती नसल्याचे म्हटले आहे.
२१ जूनला सुटी देणार का यावर विचारले असता नाईक यांनी सांगितले की, सुटीची गरज नाही. कुणी तशी मागणी केलेली नाही. गेल्यावर्षीही सुटीचा विषय निघाला नाही. योगासने सकाळी आठ वाजता केली जातात त्यामुळे सुटीची गरज नाही. जर मागणी आली तर पंतप्रधानांपुढे मांडली जाईल. यावर्षी २१ जूनला मंगळवार आहे, गेल्यावर्षी रविवार होता. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मात्र शाळांचे कामकाज सुरू राहील असे जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा