नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे. तसंच त्यांनी धर्मा-धर्मांतील लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याच्या प्रयत्नांवरही टीका केली.
काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?
“सध्याच्या घडीला दोन धर्मांच्या लोकांना एकमेकांमध्ये लढवण्याचा प्रयत्न होतो आहे. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्याची जी परिस्थिती आहे ती पाहून दुर्दैवी, उद्विग्न वाटतं. दोन धर्मांमध्ये तणाव निर्माण होईल अशी स्थिती निर्माण केली जाते आहे. ” असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.
हे पण वाचा- “आम्ही लोकांच्या जमिनी, सोनं मुसलमानांमध्ये वाटू असं…” चिदंबरम यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
८० टक्के हिंदू आहेत मग त्यांना कसला धोका?
“देशात ८० टक्के हिंदू आहेत आणि १४ टक्के मुस्लिम आहेत. १४ टक्के मुस्लिमांपासून ८० टक्के मुस्लिमांना कसला आणि कुठला धोका असू शकतो? आम्ही कधीही आमच्या हक्कापेक्षा जास्त आम्हाला द्या अशी मागणी केली नाही. मला एक मुस्लिम माणूस दाखवा संपूर्ण देशात जो त्याच्या हक्कापेक्षा जास्तीची मागणी करत असेल. आमचा हक्क तर आम्ही मागू शकतो ना?” असा उद्विग्न सवाल त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमध्ये एक भाषण केलं होतं. त्यातला संदर्भ घेऊन ओमर अब्दुल्लांनी मोदींवर टीका केली आहे. तसंच धार्मिक तेढ वाढवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. या देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे असं मनमोहन सिंग म्हणाले होते. असा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसची सत्ता आल्यास ते देशाची संपत्ती मुस्लिमांना देऊन टाकतील असं वक्तव्य केलं होतं. त्यावर टीका करताना ओमर अब्दुल्लांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.