Omar Abdullah Advice Congress and INDIA Ally : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी (१५ डिसेंबर) काँग्रेससह त्यांच्या इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांना एक सल्ला दिला आहे. अब्दुल्ला म्हणाले की “या लोकांनी (इंडिया आघाडीतील पक्ष) ईव्हीएमची तक्रार करणं थांबवायला हवं आणि निवडणुकीचा जो काही निकाल समोर आला आहे तो स्वीकारायला हवा”. अब्दुल्लांनी आपला मित्रपक्ष काँग्रेसला ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन वरून (ईव्हीएम) सुनावलं आहे. याबाबत भाजपाच्या सुरात सूर मिसळून अब्दुल्ला म्हणाले, “तुम्ही जिंकलात की ‘ईव्हीएम’वर टीका करत नाही आणि पराभूत झाल्यावर ईव्हीम’ला दोष देता. त्यामुळे मला कळत नाही की तुम्ही निवडणुकीचे निकाल का स्वीकारू शकत नाही?” ओमर अब्दुल्ला यांच्या या नव्या वक्तव्यावरून त्यांचा पक्ष ‘नॅशनल कॉन्फरन्स’ काँग्रेसवर नाराज असल्याचं उघड झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष आणि काँग्रेसची आघाडी होती. मात्र, हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करत या निवडणुकांच्या निकालाबाबत शंका व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते कागदी मतपत्रिका पुन्हा वापरात आणण्याची मागणी करत आहेत. ‘पीटीआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ओमर अब्दुल्ला म्हणाले, “याच ‘ईव्हीएम’ मशीनच्या जोरावर तुम्हाला लोकसभा निवडणुकीत शंभरपर्यंत जागा मिळाल्या. तेव्हा तुम्ही विजय मिळाल्याप्रमाणे उत्सव साजरा केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी तुम्हाला लोकसभेप्रमाणे अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून तुम्ही आता ‘ईव्हीएम’ला दोष देताय. निवडणुकीचे निकाल नेहमी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच लागती असं नाही”.

हे ही वाचा >> Zakir Hussain Passed Away : “त्यांची कला सदैव आठवणीत राहील”, झाकीर हुसैन यांना राहुल गांधींनी वाहिली आदरांजली

केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला अब्दुल्ला यांचा पाठिंबा

ईव्हीएमवरून आपल्याच मित्रपक्षांना सल्ले देणाऱ्या ओमर अब्दुल्ला यांना मुलाखतकाराने तुम्ही भाजपा प्रवक्त्यांप्रमाणे बोलत आहात, असं म्हटल्यावर ते म्हणाले, “भाजपा प्रवक्ता होण्याची पाळी ईश्वराने माझ्यावर कधी आणू नये. मी केवळ जे सत्य आहे तेच मांडत आहे. यापूर्वीही मी केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. यातून माझी विचार करण्याची स्वतंत्र पद्धत दिसून येते. राजधानी दिल्लीतील ‘सेंट्रल व्हिस्टा’बाबात विरोधकांचं आणि माझं मत वेगळं आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने जे घडत आहे, ती चांगली बाब आहे. मला वाटतं की नवीन संसद भवनाची इमारत बांधणे ही एक उत्कृष्ट कल्पना होती. आम्हाला नवीन संसद भवनाची गरज होती. जुन्या संसद भवनाची उपयुक्तता आता संपली आहे.

हे ही वाचा >> Arvind Kejriwal : “एक दिल्ली का बेटा, दो सीएम के बेटे”, केजरीवालांसमोर दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचे आव्हान

अब्दुल्ला यांची नाराजी

विरोधकांच्या, प्रामुख्याने काँग्रेसच्या ‘ईव्हीएम’विरोधाचा मुद्दा तुम्हाला चुकीचा वाटतो का? असा प्रश्न विचारल्यावर अब्दुल्ला म्हणाले, “मतदान यंत्रणेवर विश्वास नसेल तर या पक्षांनी निवडणूक लढवू नये. मतदानयंत्रात समस्या असतील तर विरोधी पक्षांनी आपल्या ‘ईव्हीएम’ विरोधामध्ये सातत्य ठेवावे. नुसते आरोप करून त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, हे लक्षात घ्ययला हवं. निवडणूक जिंकल्यावर मूग गिळून गप्प बसायचं आणि पराभव झाल्यावर ईव्हीएमवर संशय व्यक्त करायचा हे चुकीचं आहे”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omar abdullah advice congress india ally dont contest elections over evm allegations asc