Omar Abdullah on S Jaishankar’s remark over POK, Article 360 : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानने बळकावलेला भारताचा भाग (पाकव्याप्त काश्मीर) परत भारताला मिळण्याची आम्ही वाट पाहतोय. तो हिस्सा भारताकडे परत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल.” जयशंकर यांच्या या वक्तव्यावर भारत व पाकिस्तानमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. अब्दुल्ला म्हणाले, “कालच आपले परराष्ट्रमंत्री म्हणाले आहेत की आम्ही पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार आहोत. अहो, पण आम्ही त्यांना कुठे अडवलंय? तुम्हाला पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणायचा आहे, मग आणा. तुम्हाला अडवलंय कोणी? तुम्ही जम्मू-काश्मीरचा नकाशा पाहिलात तर त्यात आपला एक मोठा भूभाग पाकिस्तानात असल्याचं दिसतं. मात्र, काश्मीरचा आणखी एक मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाही.”
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “तुम्ही पीओके भारतात आणणार आहात तर कृपा करा आणि चीनच्या ताब्यात आपला भूभाग आहे तो देखील भारतात परत आणा.” भाजपावर निशाणा साधत अब्दुल्ला म्हणाले, “तुम्ही लोकांनी जम्मू काश्मीरच्या नकाशाचे दोन तुकडे केले आहेत. आता म्हणतायत की लडाखच्या लोकांना हेच हवं होतं. परंतु, तुम्ही खरंच कधी लडाखच्या लोकांना विचारलंय का त्यांना नेमकं काय हवं होतं? काय हवं आहे?”
लंडनमधील थिंक टँक चॅथम हाउसमधील आयोजित एका कार्यक्रमात ‘भारताचा उदय व वैश्विक भूमिका’ या विषयावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी जयशंकर यांना काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करण्याचा भारताचा फॉर्म्युला विचारला असता ते म्हणाले, “जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तीन टप्प्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. आम्ही त्यावर काम करत असून अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झालं आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करण्यात आमचं सरकार यशस्वी होईल.
काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांत : जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही कलम ३७० हटवलं. दुसऱ्या टप्प्यात काश्मीरमध्ये विकास व आर्थिक उलाढाल वाढवण्यासह सामाजिक न्याय बहाल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तिसऱ्या टप्प्यात काश्मीरमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवून लोकशाही अधिक बळकट करण्याचं काम केलं जात आहे. आम्ही नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेतली”.