काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० बाबत केव्हाही आणि कुठेही चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हान काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना गुरुवारी दिले.
कलम ३७० बाबत जर माझ्याशी चर्चा करायची असेल तर मी तयार आहे. त्यांनी केव्हा आणि कुठे ते सांगावे. हवे असेल तर अहमदाबाद येथेही याबाबत खुली चर्चा करायला तयार असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी मोदी यांना आव्हान दिले. नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हे राज्यातील नागरिकांना लाभदायक आहे का, याबाबत चर्चा करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी म्हटले होते.
ते पुढे म्हणाले की, ज्या जम्मू आणि काश्मीरबद्दल काहीही माहिती नाही, ज्यांनी कलम ३७० वाचलेले नाही तेच त्याविषयी बोलत असल्याबद्दल मला आश्चर्य  वाटत आहे. कलम ३७० च्या तरतुदीमुळे काश्मीर राज्य देशाच्या इतर भागाला जोडले जाते. कलम ३७० चे कोणी नुकसान केले आणि त्याचा जम्मू काश्मीर राज्यावर कसा परिणाम होतोय, याची आम्हाला कल्पना असल्याचेही ते म्हणाले.
जम्मू काश्मीरबद्दल माहिती नसल्याची मोदींवर टीका करताना ओमर म्हणाले की, जी व्यक्ती मोठय़ा पदावर आहे आणि सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची स्वप्ने पाहत आहे, त्या व्यक्तीला जम्मू काश्मीरबद्दल अधिक माहिती नाही आणि राज्यात गुज्जरांवर अन्याय होत असल्याचा दावा करीत आहे, याबाबत मला खरोखरच आश्चर्य वाटत आहे.
राज्यात गुज्जरांची योग्य ती काळजी घेतली जाते. मात्र मोदींना खरेच जर त्यांची काळजी असेल तर राजस्थानमध्ये या समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत काही तरी करावे, असे ओमर यांनी सुनावले. तसेच काश्मिरी पंडितांशिवाय काश्मीर राज्य पूर्ण होऊ शकणार नाही, असे स्पष्ट करीत काश्मिरी पंडित जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले.
कलम ३७० बरोबर काश्मिरी पंडितांच्या वेदनेवर चर्चा व्हावी
कलम ३७०वरून भाजप मवाळ?

Story img Loader