काश्मीरमधील ‘द्वेषमूलक हल्ल्यांसाठी’ मुख्यमंत्रिपदी आलेले मुफ्ती मोहम्मद सईद हेच जबाबदार असून, स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांनी प्रत्येक गोष्टीचा सौदा केला असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला.
खुर्ची वाचवण्यासाठी सईद यांनी सौदेबाजी केली आहे. राज्यात राजौरी, उधमपूर किंवा इतरत्र झालेल्या हल्ल्यांसाठी तेच प्रत्यक्षरीत्या जबाबदार आहेत, असे अब्दुल्ला यांनी पत्रकारांना सांगितले. जम्मू भागात राजौरीसह इतर ठिकाणी मुस्लीम वाहतूकदारांवरील हल्ल्यांत वाढ झाली असल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे कार्याध्यक्ष असलेले ओमर यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
अशा घटकांना दूर ठेवण्यासाठी आपण सईद यांच्यापुढे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला होता. राज्यात भाजप आणि विशेषत: रा.स्व. संघाला प्रवेश दिल्यास आपल्यावर संकटे ओढवतील अशी भीती आम्हाला होती. दुर्दैवाने गेल्या नऊ महिन्यांत ही भीती खरी ठरली आहे, असे ओमर म्हणाले.