जम्मू : जम्मू आणि काश्मीर विधानसभेत सोमवारी पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर झाला. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अनेकदा भावूक झाले. यजमान राज्याचा मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री म्हणून पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली होती… मात्र यात कमी पडलो, अशा शब्दांत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. हल्ल्याविरोधात काश्मिरी जनतेमध्ये उमटलेला अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त संताप ही दहशतवादाच्या अंताची सुरुवात असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानसभेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या २७ मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री अब्दुला यांनी संपूर्ण सभागृहाचे मन जिंकले. त्यांच्या वाक्यांना सत्ताधारी तसेच विरोधी सदस्ये बाके वाजवून अनुमोदन देत होते. त्यावेळी हा बाके वाजविण्याचा नव्हे, तर निषेधाचा आणि एकोपा दाखविण्याचा क्षण असल्याचे अब्दुल्ला यांनी ठणकाविले.
‘‘दहशतवादाच्या धोक्याविरोधात जनतेचा संघर्ष मजबूत करण्यासाठी आपले सरकार काम करेल. हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरची जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली ही बाब आशेचा किरण आहे. त्याच वेळी हल्ल्यानंतर केल्या जाणाऱ्या कारवाईदरम्यान जनता दूर लोटली जाईल अशी पावले उचलणे टाळावे,’’ असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. आपण पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्याचे आवाहन केले होते, पण त्यांचे रक्षण करू शकलो नाही, मुख्यमंत्री म्हणून हे आपले अपयश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरची सुरक्षा ही आपल्या सरकारची जबाबदारी नसली तरी आपण या हल्ल्याचा वापर संपूर्ण राज्याचा दर्जा मागण्यासाठी करणार नाही असेही अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.
हुर्रयितकडूनही प्रार्थना!
१९९०च्या दशकापासून हुर्रयित कॉन्फरन्स ही संघटना फुटीरतावाद्यांचे नेतृत्व करत आली आहे. मात्र, या संघटनेचे अध्यक्ष मिरवैज उमर फारुख यांनी श्रीनगरच्या जामिया मशिदीत हल्ल्याविरोधातील प्रार्थनेचे नेतृत्व केले. इतर मशिदींमध्येही प्रथमच शुक्रवारच्या प्रार्थनेआधी दोन मिनिटांचे मौन पाळले गेल्याकडे अब्दुल्ला यांनी लक्ष वेधले.
दहशतवादी हल्ल्याविरोधातील जनतेचा संताप पाहता, आपण योग्य पावले उचलली तर ही दहशतवादाच्या अंताची सुरुवात असेल. बंदुकीने दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण जनता आपल्याबरोबर असेल तर दहशतवाद संपवू शकतो. लोक त्या दिशेने जात आहेत. – ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर
विधानसभेत निषेधाचा ठराव
उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी निषेधाचा ठराव मांडला. ‘सर्व नागरिकांसाठी शांतता, विकास आणि सर्वसमावेशक समृद्धीच्या वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जम्मू-काश्मीरची विधानसभा आपल्या अढळ कटिबद्धतेची पुष्टी करते. तसेच देश आणि जम्मू-काश्मीरमधील धार्मिक सौहार्द आणि प्रगतीमध्ये व्यत्यय आणणाऱ्यांचे दुष्ट मनसुबे पराभूत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे स्पष्ट करते,’ असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. विविध राज्यांमध्ये राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थी आणि नागरिकांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि स्वास्थ्य यांची खबरदारी घेण्याचे आवाहन सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ठरावाद्वारे करण्यात आले.