जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लाह यांनी राज्यातल्या बेरोजगारी आणि महागाईवरून केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात इतकी बेरोजगारी वाढली आहे की, आता तरुणांमध्ये भाजपाबद्दल चिड आहे. त्यामुळे भाजपा जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घ्यायला घाबरतंय. जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची भाजपाला भिती वाटतेय हे पाहून आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही, कारण लोकांमधला संताप दिसतोय.
ओमर अब्दुल्लाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचित केली. यावेळी ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की, सध्याच्या परिस्थितीत त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही. त्यांना जागाच जिंकता येणार नाहीत. आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर ते जम्मू आणि काश्मीरमध्ये कदाचित दहा जागासुद्धा जिंकू शकणार नाहीत. त्यामुळं त्यांचं राजकीय भवितव्य हे लोकांना विभाजित करण्यावर अवलंबून आहे.
हे ही वाचा >> विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? शरद पवारांबरोबरच्या बैठकीनंतर नाना पटोले म्हणाले…
ओमर अब्दुल्लाह म्हणाले, ते (भाजपा) आता जम्मू-काश्मीरमधील मतदारांना किती चांगल्या प्रकारे विभाजित करू शकतात, त्यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे, आणि आता ते तेच करत आहेत. फोडा आणि राज्य करा. पण निवडणुका येऊ द्या, मग बघा तुम्हाला जम्मू-काश्मीरचे लोक शहाणे वाटतील. मला खात्री आहे की, निवडणुकीनंतर चित्र बदलेल. जम्मू काश्मीरमधील नागरिक अशा प्रकारच्या षडयत्रांमुळे त्यांच्यात फूट पडू देणार नाहीत.”