संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन काँग्रेससह देशभरातील अनेक पक्षांना एकत्र आणून केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात नवी आघाडी उभी केली होती. २६ हून अधिक पक्ष या इंडिया आघाडीत एकत्र आले होते. परंतु, जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी या आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काही छोटे पक्ष आघाडीतून बाहेर पडले आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, उत्तर प्रदेशातील जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने आघाडीला पाठ दाखवली आहे. आता काश्मीरमध्येदेखील तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष इंडिया आघाडीतील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या पीडीपीवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. नॅशनल कॉन्फरन्सला पीडीपीला दिल्या जाणाऱ्या जागांवर आक्षेप असल्याचं बोललं जात आहे. अब्दुल्लांच्या मते पीडीपीला त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त जागा दिल्या जात आहेत. ओमर अब्दुल्ला म्हणाले, मी प्रसारमाध्यमांना यापूर्वीच सांगितलं होतं की, जो पक्ष मागच्या निवडणुकीत ज्या-ज्या मतदारसंघांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता त्यांना ती जागा मागण्याचा अधिकारच नाही. मला इंडिया आघाडीत सहभागी होण्याआधीच माहिती असतं की आम्हाला आघाडीतल्या इतर सदस्यांसाठी स्वतःला कमकुवत करावं लागणार आहे तर मी कधीच इंडिया आघाडीत सहभागी झालो नसतो.
जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या पाच जागा आहेत. या पाचही जागा इंडिया आघाडीसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. परंतु राज्यात इंडिया आघाडीतल्या तीन पक्षांमध्ये या जागांसाठी रस्सीखेच चालू आहे. फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स पार्टी, महबुबा मुफ्ती यांची पीडीपी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे तीन पक्ष जम्मू-काश्मीरच्या पाच जागा वाटून घेणार होते. परंतु, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
अब्दुल्ला यांचा ‘एकला चलो रे’चा नारा
नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाने बिहारमध्ये थेट भाजपाबरोबर सरकार स्थापन करून आघाडीला पहिला धक्का दिला. त्यानंतर ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशी जागावाटपावरून मतभेद असल्याचे उघड केले. त्यानंतर आता जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.
हे ही वाचा >> राष्ट्रपतींकडून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड; पंतप्रधान मोदी म्हणाले, “सभागृहातील त्यांची उपस्थिती…”
पश्चिम बंगालपाठोपाठ पंजाबमध्येही आघाीत बिघाडी?
गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये आप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील जागावाटपाबाबत काँग्रेशसी कोणतीही चर्चा होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भगवंत मान यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.