जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांकडे भिन्न दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याने त्यांच्यात वेगळेपणाची भावना निर्माण होते अशी खंत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात त्यांनी किश्तवाड दंगलीचे चित्रण ज्या पद्धतीने देशभर माध्यमातून रंगवले गेले त्यावर नाराजी व्यक्त केली.
देशातील नागरिकांपेक्षा जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांना आपण वेगळे आहोत असे का वाटते असे आपल्याला नेहमी विचारले जाते. आम्हाला वेगळे वाटत नाही तर आमच्यात तशी भावना निर्माण केली जाते असे ओमर यांनी सांगितले. बक्षी स्टेडियममध्ये केलेल्या भाषणात त्यांनी याच मुद्दय़ावर आपल्या वेदना मांडल्या. किश्तवाडमधील जातीय दंगलीचे चित्र ज्या पद्धतीने देशात उभे करण्यात आले ते पाहता आमच्याकडे पाहण्याचा सापत्न दृष्टिकोन दिसतो असे ओमर यांनी सांगितले.  किश्तवाडमध्ये जे घडले ते निषेधार्ह आहे. या दंगलीची न्यायालयीन चौकशी केली जाणार असून, त्याचे निष्कर्ष सार्वजनिक केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. किश्तवाडच्या निमित्ताने देशात जातीय दंगल पहिल्यांदाच घडल्यासारखी वातावरणनिर्मिती भाजपने केल्याचा टोलाही ओमर यांनी लगावला. आपण या दंगलीचे समर्थन करणार नाही, मात्र इतर राज्यांतही चुका घडतात असे सांगत त्यांनी माध्यमांवरही टीका केली. इतर राज्यांतील जातीय दंगलींना माध्यमे इतके स्थान देतात काय असा, प्रश्न विचारला. तसेच किश्तवाड दंगलीवर माध्यमांनी किती वेळ आणि जागा खर्च केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.