एकीकडे जागतिक पातळीवर ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. या व्हेरिएंटवर सध्याच्या लसी प्रभावी ठरतील की नाही? इथपासून ते तिसऱ्या लाटेचं संकट येईल का आणि आलं तर ओमायक्रॉनमुळेच येईल का? इथपर्यंत सर्व बाबतीत दावे केले जात आहेत. तिसऱ्या लाटेविषयीची भिती ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडण्याच्याही आधीपासून व्यक्त केली जात होती. तिचं स्वरूप किती धोकादायक असेल, याविषयी मतमतांतरं होती. मात्र, आता वेगाने प्रसार होण्याचा गुणधर्म असलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडल्यामुळे तिसऱ्या लाटेविषयी पुन्हा दावे केले जात आहेत. तिसरी लाट तयार करण्याचे सर्व गुणधर्म ओमायक्रॉनमध्ये असल्याचा दावा सीएसआयआरचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी एएनआयशी बोलताना केला आहे.

“जर आपण कोविड १९च्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा अभ्यास केला, तर तिसरी लाट तयार करू शकणाऱ्या व्हेरिएंटचे सर्व गुणधर्म त्याच्यात आहेत. मानवी प्रतिकारशक्तीला तो बेमालूमपणे चकवा देऊ शकतो हे समोर आलेल्या अभ्यासातून दिसून आलंय”, असं डॉ. अग्रवाल म्हणाले.

तिसरी लाट येईल, पण…

दरम्यान, डॉ. अग्रवाल यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. “आपण सर्वच विचार करतोय, त्याप्रमाणे तिसरी लाट नक्कीच येईल. पण ही लाट करोनाबाधितांची संख्या वाढण्याच्या स्वरूपात दिसून येईल. पण ती जीवघेणी नसेल. आपल्या आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण करण्याइतपत तिचं स्वरूप मोठं नसेल”, असं डॉ. अग्रवाल म्हणाले आहेत.

हायब्रिड इम्युनिटीवर भिस्त?

“सध्या सर्वात चांगली इम्युनिटी कोणती असेल, तर ती हायब्रिड इम्युनिटी आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येमध्ये हायब्रिड इम्युनिटी आहे. तुम्हाला जर आधी करोनाची लागण होऊन गेल्यानंतर एखादा जरी लसीचा डोस दिला गेला असेल, तर तुमच्यात ती हायब्रिड इम्युनिटी तयार होते”, असं देखील डॉ. अग्रवाल यांनी नमूद केलं आहे.

ओमायक्रॉनविरोधात ‘हायब्रिड इम्युनिटी’ करणार भारतीयांचा बचाव? CSIR च्या वैज्ञानिकांचा मोठा दावा!

आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी लागेल

सुरुवातीच्या काळात लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल, असं अग्रवाल म्हणाले आहेत. “अद्याप लसच घेतली नसलेल्यांची प्रतिकारशक्ती सर्वात कमकुवत असेल. पण दुसऱ्या लाटेच्याही आधी लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांना पुन्हा करोनाची बाधा होऊ शकते. त्यासाठी बूस्टर डोससारख्या पर्यायाचा विचार करायला हवा”, असं ते म्हणाले.

Story img Loader