भारतात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडल्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्राधान्याने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणं हेच आपलं लक्ष्य असल्याचं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे घाबरण्याचं कारण नाही, मात्र सतर्क राहावं लागेल, असं केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं एक ट्वीट व्हायरल झालं आहे. या ट्वीटमधून अरविंद केजरीवाल यांनी भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव होण्याला केंद्र सरकारला जबाबदार धरल्याचं सूचित होत असून त्यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
ओमायक्रॉनचा ३० देशांमध्ये शिरकाव
अवघ्या दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलताना देशात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण नसल्याची माहिती दिली होती. मात्र, आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्याची माहिती दिली आहे. आत्तापर्यंत ३० देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले एकूण ३७३ रुग्ण सापडले आहेत. या दोन्ही रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणं आढळल्याचं समोर आलं आहे.
“…हे दु:खदायक आहे”
दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केलं आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बोट ठेवलं आहे. “(ओमायक्रॉन व्हेरिएंटने) प्रभावित देशांमधून येणारी विमानं आपण थांबवली नाहीत हे दु:खदायक आहे”, असं अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
विमान वाहतुकीवरील निर्बंधांची केली होती मागणी
दक्षिण अफ्रिकेमध्ये पहिल्यांदा ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर त्यापाठोपाठ अफ्रिकेतील इतर काही देश आणि युरोपातील देशांमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याचं समोर आलं होतं. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि देशातील इतर काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्या देशांमधून येणारी विमानं तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, तसा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला नाही.