जगभरात ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटची भिती पसरू लागली आहे. एकीकडे काही शास्त्रज्ञ ओमायक्रॉन आधीच्या व्हेरिएंटइतका घातक नसल्याचं सूत्र मांडत आहेत, तर दुसरीकडे काहीजण अधिक काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. पण या सर्वांनीच ओमायक्रॉनबाबत अधिक सखोल संशोधन होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता थेट WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रॉस यांनीच ओमायक्रॉन व्हेरिएंटविषयी जगातील सर्व देशांना गंभीर इशारा दिला आहे. “ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर हीच योग्य वेळ आहे”, अशा शब्दांत त्यांनी जगाला सतर्क केलं आहे.

“जागतिक पातळीवर ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय, ते पाहाता त्याचा एकूणच करोनाच्या साथीबाबत मोठा परिणाम जाणवू शकतो हे दिसून येत आहे. जर ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर अजून रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावलं उचलायला हवीत. हीच योग्य वेळ आहे”, असं टेड्रॉस म्हणाले आहेत.

…यावर ओमायक्रॉनचा प्रसार अवलंबून असेल

दरम्यान, जगातील सर्व देशांनी यावर तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले आहेत. “आज आणि येणाऱ्या काही दिवसांत जगभरातील देश जी पावलं उचलतील, त्यावरच ओमायक्रॉन व्हेरिएंट कशा पद्धतीने वाढेल, हे अवलंबून असेल. जर इतर देश त्यांच्या रुग्णालयांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण दाखल होण्याची वाट पाहू लागले, तर फार उशीर होईल. अजिबात वाट पाहू नका, आत्ता पावलं उचला”, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.

आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की..

जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉनबाबत जगातील सर्वच देशांना आवाहन केलं आहे. “आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की त्यांनी सतर्क राहून तपासणी आणि जेनोम सिक्वेन्सिंगची संख्या वाढवायला हवी. यामध्ये आता कोणताही गोंधळ झाला, तर त्यात अजून जीव जातील”, असं टेड्रॉस म्हणाले आहेत.

“..पण तो परिणाम काय असेल, हे सांगता येणं कठीण”

ओमायक्रॉन व्हेरिएंट आता जवळपास ५७ देशांमध्ये पोहोचल्याची माहिती मिळत आहे. तो अजून वेगाने इतर देशांमध्येही पसरेल, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेला वाटत आहे. “ओमायक्रॉनचं जागितक पातळीवर वेगाने पसरणं किंवा ३० हून अधिक संख्येनं असणारे म्युटेशन या गोष्टी हेच दर्शवत आहेत की त्याचा करोना साथीच्या एकूणच घडामोडींवर मोठा परिणाम होऊ शकतो. पण तो परिणाम नेमका काय असेल, हे मात्र आत्ता सांगता येणं कठीण आहे”, असं टेड्रॉस यांनी नमूद केलं आहे.

ओमायक्रॉनमुळे मृत्यू होणार नाही, पण..

दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंट जीवघेणा नसल्याचं अनेक संशोधकांचं मत आहे. मात्र, याबाबत डॉ. टेड्रॉस यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. “या व्हेरिएंटमुळे मृत्यू होण्याची शक्यता जरी कमी असली, तरी अनेकांना यातून दीर्घकालीन समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यात करोनाचा दीर्घकाळ सामना करणं किंवा करोनातून बरे झाल्यानंतर येणाऱ्या आजारांचा सामना करणं अशा गोष्टी घडू शकतात. आत्ता कुठे आम्हाला ओमायक्रॉनची काही लक्षणं समजू लागली आहेत”, असं ते म्हणाले.

ओमायक्रॉन व्हेरिएंट नेमका किती घातक? WHO नं दिला मोठा दिलासा; म्हणे, “वेगाने प्रसार होणारा, मात्र…!”

“दररोज ओमायक्रॉनविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे. पण याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांना अजून वेळ मिळणं गरजेचं आहे. त्याशिवाय निश्चित अशा निष्कर्षापर्यंत पोहोचणं कठीण आहे. जागतिक आरोग्य संघटना देखील दररोज जगभरातील हजारो तज्ज्ञांशी चर्चा करून याविषयी अभ्यास करत आहे”, असं देखील ते म्हणाले.