बाजारपेठेतील मुल्यानुसार (मार्केट कॅपिटलनुसार) देशातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजला (आरआयएल) मोठा धक्का बसला आहे. कंपनीने फ्युचर रिटेल ग्रुपबरोबर होणाऱ्या व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे. सिंगापूर इंटरनॅशनल अॅट्रीब्युटर सेंटर म्हणजेच एसआयएसीने ही स्थगिती दिली आहे. फ्युचर ग्रुप आणि आरआयएलमध्ये करण्यात येत असलेल्या व्यवहारासंदर्भात ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या अॅमेझनने सिंगापुरमध्ये एक याचिका दाखल केली आहे. मध्यस्थता पॅनलच्या निर्णयानंतर किशोर बियानी यांच्या फ्युचर ग्रुपने मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलरसोबतचा व्यवहार सध्या स्थगित केल्याचे समजते. एक सदस्यीय मध्यस्थता पॅनलने मागील आठवड्यामध्ये अॅमेझॉन आणि फ्युचर ग्रुप दरम्यानच्या याचिकेवर सुनावणी केली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सध्या न्यायलायने दिलेला आदेश हा ९० दिवसांसाठी लागू होणार आहे. त्या दरम्यान नवीन मध्यस्थीची नेमणूक करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

रिलायन्स आणि फ्युचर समूहामधील हा व्यवहार जवळजवळ २५ हजार कोटींचा आहे. अॅमेझॉनने फ्युचर कूपन या कंपनीला एक कायदेशीर नोटीस पाठवली होती. यामध्ये रिलायन्स रिटेलबरोबर व्यवहार करुन फ्युचर समूहातील ही कंपनी अॅमेझॉनबरोबरच्या करारातील अटींचे उल्लंघन करत असल्याचे नमूद करण्यात आलं होतं. याचसंदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती.

मात्र रिलायन्सने आपण ठरलेल्या वेळामध्येच हा व्यवहार पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे. तर अॅमेझॉनने या निर्णयाचे स्वागत केलं आहे. आम्ही या निर्णयावर संतुष्ट असून हा निर्णय आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे असंही म्हटलं आहे. दोन्ही कंपन्यांनी जर हा व्यवहार पुढे सुरु ठेवला तर आम्ही पुन्हा दाद मागू असंही कंपनीने म्हटलं आहे.

आणखी वाचा- समजून घ्या : अंबानी विरुद्ध बोझस… २५ हजार कोटींचा वाद नक्की आहे तरी काय?

काय आहे व्यवहार

रिलायन्सने ‘फ्युचर’ समूहाचा किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसाय ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच ताब्यात घेण्याची घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘फ्युचर’ समूहाचा किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसाय २९ ऑगस्ट रोजी ताब्यात घेत असल्याचं जाहीर केलं. २४,७१३ कोटी रुपयांच्या मोबदल्यात रिलायन्सने हे अधिग्रहण केलं. या व्यवहारामुळे रिलायन्सचा किराणा क्षेत्रातील विस्तार आणखी मजबूत होण्याची कंपनीला अपेक्षा आहे. ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या ई-व्यापार कंपनीचा तुल्यबळ स्पर्धक म्हणून रिलायन्सने हे पाऊल टाकल्याचे सांगितले जाते. ‘रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लि.’ या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनीमार्फत फ्युचर ग्रुपच्या किराणा व्यवसायातील अधिग्रहण व्यवहार करण्यात आला. या व्यवहारामुळे बिग बझार, एफबीबी, इझीडे, सेंट्रल, फुडहॉल या किराणा नाममुद्रांसह ४२० शहरांतील त्यांच्या १८०० विक्री दालनांवर रिलायन्सचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. ‘फ्यूचर’ समूहाचा लॉजिस्टिक (रसद पुरवठा) व्यवसाय आणि गोदाम व्यवसायही रिलायन्स ताब्यात घेणार आहे. छोटे व्यापारी आणि किराणा दुकानदार त्याचबरोबर मोठय़ा ब्रँडना बरोबर घेण्याचे आमचे धोरण असून ग्राहकांनी मोजलेल्या पैशाचे त्यांना वस्तूंच्या रूपात पुरेपूर मूल्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे रिलायन्स रिटेलच्या संचालक इशा अंबानी यांनी सांगितले.

Story img Loader