बांगलादेशच्या दौऱ्यावर असलेले भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलपासून जवळच अज्ञात मोटारसायकलस्वारांनी गावठी बॉम्बचा स्फोट घडवल्याने खळबळ उडाली. ढाकामधील सार्क फाउंटन येथे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास केलेल्या या स्फोटात कोणीही जखमी झालेले नाही, तर राष्ट्रपतींच्या कार्यालयानेही या घटनेला जास्त महत्त्व देण्याचे टाळले.
बांगलादेश निर्मितीच्या वेळी १९७१मध्ये झालेल्या हत्यांप्रकरणी जमात-इस्लामी या कट्टरवादी पक्षाच्या तीन नेत्यांना फाशी सुनावण्यात आल्याच्या निषेधार्थ बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र हिंसाचार सुरू आहे. या पक्षाच्या प्रमुख खलिदा झिया यांनी राष्ट्रपती मुखर्जी यांना भेटण्यासही नकार दिला आहे. अशातच सोमवारी मुखर्जी यांच्या हॉटेलबाहेर झालेल्या या स्फोटाने खळबळ उडाली. बांगलादेशची राजधानी ढाकाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सोनारगाव पॅन पॅसिफिक हॉटेलमध्ये मुखर्जी व त्यांच्यासह आलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे वास्तव्य आहे. या हॉटेलपासून अवघ्या १०० यार्डावर असलेल्या सार्क फाउंटन या ठिकाणी गावठी बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका टोपीत दडवलेला बॉम्ब सार्क फाउंटनच्या दिशेने भिरकावून त्याचा स्फोट घडवला. मात्र, सुदैवाने या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही.
स्फोट होण्यापूर्वी काही मिनिटे आधीच, मुखर्जी हे एका कार्यक्रमावरून या हॉटेलमध्ये परतले होते. मात्र, हा स्फोट त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी घडवण्यात आला नसून जमात-इस्लामीने पुकारलेल्या देशव्यापी संपाचा प्रभाव वाढवण्यासाठी केला असावा, असा दावा या परिसरातील तेजगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी अपूर्व हसन यांनी केला. या घटनेनंतर हॉटेलभोवतालची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.
राष्ट्रपतींच्या कार्यालयानेही या स्फोटाला जादा महत्त्व दिलेले नाही. बांगलादेशमध्ये संप किंवा बंद दरम्यान असे ‘किरकोळ’ स्फोट घडवले जातात. मात्र त्याला बॉम्बस्फोट म्हणता येणार नाही. दौऱ्यावर असलेल्या भारताच्या प्रतिनिधींपैकी एकालाही या स्फोटाचा आवाज ऐकू आला नाही. राष्ट्रपतींचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमधील वातावरण नेहमीप्रमाणे आहे, असे राष्ट्रपतींचे प्रसारमाध्यम प्रवक्ते वेणू राजामणी यांनी सांगितले.

Story img Loader