आज शुक्रवारी कवच या ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणालीची चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी एका ट्रेनमध्ये खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री होते. एकाच ट्रॅकवर दोन गाड्या भरधाव वेगात समोरासमोर आल्या. त्यापैकी एका ट्रेनमध्ये केंद्रीय मंत्री होते. पण ‘कवच’ मुळे दोन्ही गाड्यांच्या इंजिनची टक्कर झाली नाही. कवच ही भारतीय रेल्वेने विकसित केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली असून ही चाचणी यशस्वी ठरली आहे.
अपघात रोखण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेल्या कवचची सिकंदराबाद येथे प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली लोको पायलट आणि चाचणीसाठी इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी या चाचणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कवच प्रणालीची यशस्वी चाचणी दाखवण्यात आली आहे. क्लिपची सुरुवात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यात ज्या ट्रेनमध्ये ते आहेत, त्याच ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणारी दुसरी ट्रेन दाखवली आहे.
या डिजिटल सिस्टीममुळे रेड सिग्नलकडे दुर्लक्ष करणे किंवा अन्य काही बिघाड अशा मानवी चुकांमुळे ट्रेन आपोआप थांबेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या सिस्टीमसाठी प्रति किलोमीटर 50 लाख रुपये येणार आहेत. तर जागतिक स्तरावर अशा सुरक्षा यंत्रणेसाठी प्रति किलोमीटर सुमारे दोन कोटी रुपये खर्च येतो, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.