रामपूरमधील भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या आझम खान यांचा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी समाचार घेतला आहे. सुषमा स्वराज यांनी टि्वट करुन मुलायम सिंह यादव यांना भीष्माप्रमाणे मौन रहाण्याची चूक करु नका असे सांगितले आहे.

मुलायम भाई तुम्ही समाजवादी पार्टीचे पितामह आहात. तुमच्यासमोर रामपूरमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण होत आहे. तुम्ही भीष्माप्रमाणे मौन रहाण्याची चूक करु नका असे सुषमा स्वराज यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. सुषमा स्वराज यांनी आपल्या टि्वटमध्ये समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव आणि जया बच्चन या महिला नेत्यांनाही टॅग केले आहे.

काल रामपूर येथील सभेत आझम खान यांनी भाषण करताना मर्यादा सोडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली. त्यांनी अभिनेत्री आणि भाजपा उमेदवार जयाप्रदा यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले. जाहीर सभेमध्ये आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केली. राष्ट्रीय महिला आयोगानेही आझम खान यांच्या वक्तव्याची दखल घेतली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मी दोषी ठरलो तर निवडणुकीतून माघार घेईन असे आझम खान यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतान सांगितले. मी दिल्लीमधल्या आजारी असलेल्या एका व्यक्तीबद्दल बोलत होतो. तो म्हणाला होता माझ्याकडे १५० रायफल असून आझम खान समोर दिसले तर त्यांना गोळी घालीन. मी त्याच्याबद्दल बोलत होतो. लोकांना त्याच्याबद्दल समजायला वेळ लागला नंतर त्याने आरएसएसची पँट घातली असल्याचे समजले. मी त्याच्याबद्दल बोलत होते अशी सारवासारव आझम खान यांनी केली आहे.