मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मतदारांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली असून सर्वानी कामाला लागा, असे आदेश त्यांनी सहकाऱ्यांना दिले. विधानसभा अधिवेशनात विश्वासमत प्रस्तावाचे काय व्हायचे ते होऊ द्या, आम्ही निवडणुकीला तयार आहोत, असे सूचक वक्तव्यही केजरीवाल यांनी केले.
रामलीला मैदानावर शपथविधी आटोपल्यानंतर केजरीवाल यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी रामलीलावरील भाषणादरम्यान त्यांनी ‘आप’च्या विजयाचे श्रेय नागरिकांना दिले. त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही कृत्य आपल्याकडून किंवा सहकाऱ्यांकडून होणार नाही याची ग्वाहीही त्यांनी दिली. भ्रष्टाचारविरोधातील लढाईची आता खरी सुरुवात झाली असल्याचे ते म्हणाले. भाषणादरम्यान केजरीवाल यांनी भाजपचे सभागृह नेते डॉ. हर्षवर्धन यांची स्तुती केली. डॉ. हर्षवर्धन चांगले आहेत, पण त्यांच्या पक्षाविषयी असे काही म्हणण्याची सोय नाही, असे म्हणताच हास्याचे कारंजे उसळले. भाजप व काँग्रेसला सहकार्याचे आवाहन त्यांनी केले. एखाद्या अधिकाऱ्याने लाच मागितल्यास त्याला हो म्हणा. सरकारला कळवा. आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडू. हाच भ्रष्टाचार मिटवण्याचा उपाय असल्याचे ते म्हणाले. आयुष्यात कधीही लाच देणार अथवा घेणार नाही, अशी शपथ केजरीवाल यांनी या वेळी समर्थकांना दिली. आम आदमी पक्षाच्या प्रार्थनेने केजरीवाल यांनी भाषणाचा समारोप केला.
मंत्री, अधिकारी लाल दिवा वापरणार नाहीत
व्हीआयपी संस्कृती हद्दपार करण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या सरकारने गाडीवर लाल दिवा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली सरकारचा कोणताही मंत्री अथवा अधिकारी लाल दिव्याचा वापर करणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही अधिकाऱ्याला वैयक्तिक सुरक्षा अथवा सुरक्षेसाठी वापरण्यात येणारा गाडय़ांचा ताफाही पुरविण्यात येणार नाही, असेही बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले.
‘वंदे मातरम्’
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज, गिरीश सोनी, सत्येंद्र जैन व राखी बिर्ला यांनीदेखील पद व गोपनीयतेची शपथ घेतली. सर्वच मंत्र्यांनी हिंदीतून शपथ घेतली. एरव्ही नायब राज्यपाल केवळ शपथेची सुरुवात करून देतात.
या वेळी नजीब जंग यांनी संपूर्ण शपथ दिली.
राखी बिर्ला यांचा अपवादवगळता प्रत्येक मंत्र्याने थेट शपथ घेण्यास प्रारंभ केला. राखी बिर्ला यांनी शपथ घेण्यापूर्वी ‘भारत माता व वंदे मातरम्’चा जयजयकार
केला.
क्षणचित्रे
*सकाळी नऊ वाजेपासून रामलीला मैदानावर प्रवेश दिला जात होता.
*नजीकच्या नवी दिल्ली मेट्रो स्थानकावर तोबा गर्दी. समर्थकांच्या हातात तिरंगा व डोक्यावर ‘आप’ची टोपी.
*‘भ्रष्टाचार के खिलाफ आँधी है, केजरीवाल दुसरा गाँधी है’, अशा घोषणांनी मेट्रो स्टेशन, रामलीला मैदानाचा परिसर दणाणून गेला होता.
*हवामान खात्याचा अंदाज- वातावरण ढगाळ व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. प्रत्यक्षात आकाश मोकळे व सुखावणारे ऊन.
*रामलीला मैदानाच्या सभोवती अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करणारी दोनेक डझन पोस्टर्स लावण्यात आली होती. पाण्याच्या बाटल्या आणण्यास मनाई.
*मैदानात अस्थायी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
*देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती. भाजप व काँग्रेस आमदारांनी पाठ फिरवली.
*मैदानावर शुक्रवारी मध्यरात्रीपासून पाणी फवारल्याने धूळ नाही.
*११ वाजून ४० मिनिटांनी केजरीवाल व कुटुंबीयांचे रामलीला मैदानावर आगमन. समर्थकांनी रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडले.
*शपथविधी सोहळ्यास ११:५० ला प्रारंभ. कार्यक्रमाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने.
*व्यासपीठ साधेसे; परंतु आकर्षक. झेंडूच्या फुलांचे तोरण.
*व्यासपीठाच्या समोर ‘आप’चे विजयी आमदार व त्यांचे नातेवाईक बसले होते.
*केजरीवालांनी भाषणात अण्णा हजारे यांचा दोनदा उल्लेख केला. निवडणुकीतील विजयासाठी परमेश्वर, अल्लाह व वाहे गुरूंचे आभार.
*बॅरिकेट्स लंघून व्यासपीठाकडे येऊ पाहणाऱ्या युवकांना केजरीवाल यांनी समज दिली. त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट.
*युवक, विद्यार्थी-विद्यार्थिनींची तोबा गर्दी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा