अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिका आणि भारत हे कधीही एकमेकांपासून वेगळे न करता येणारे जोडीदार असल्याचा उल्लेख बायडेन यांनी केला. तसेच भविष्यातही दोन्ही देश जागतिक स्तरावरील आव्हांनां तोंड देण्यासाठी एकत्र काम करत राहतील असा विश्वास बायडेन यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा >> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण
अमेरिकेतील चार बिलियन भारतीयांसहीत जगभरातील भारतीय आज भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करत आहेत, असं म्हणत बायडेन यांनी १५ ऑगस्टनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या शिकवणीच्या आधारे लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेली भारताची वाटचाल साजरी करताना आज अमेरिका भारतीयांसोबत आहे,” असं बायडेन यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.
या वर्षी आम्हीसुद्धा एका सर्वात श्रेष्ठ अशा लोकशाही देशासोबतच्या आमच्या संबंधांची ७५ वर्ष साजरी करत आहोत. भविष्यामध्येही दोन्ही देशांमधील लोकांमधील दृढ विश्वास पाहता हे नातं अधिक घट्ट होणार आहे, असा विश्वासही बायडेन यांनी व्यक्त केला आहे. “भारत आणि अमेरिका हे कधीही वेगळे न करता येणारे जोडीदार आहेत. कायदेशीर मार्गाने कारभार चालावा त्याचप्रमाणे मानवी स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा जपली जावी यासाठी दोन्ही देशांनी आतापर्यंत धोरणात्मक पद्धथीने काम केलं आहे,” असंही बायडेन यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील भारतीयांनी अमेरिकेला अधिक कल्पनात्मक, सर्वसमावेशक आणि शक्तीशाली देश बनवण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचा उल्लेखही बायडेन यांनी केला आहे.
मला विश्वास आहे की येणाऱ्या वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका हे दोन्ही लोकशाही देश कायद्याचं राज्य असावं यासाठी, शांतता नांदावी म्हणून आणि दोन्ही देशांमधील लोकांची सुरक्षा आणि भरभराटीसाठी एकत्र काम करतील, असंही बायडेन म्हणालेत.