प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या शानदार संचलनाची सुरुवात आणि सांगता ही नेहमीच संरक्षण दलाच्या विविध विमाने आणि हेलि़कॉप्टर यांच्या सलामीने होत असते. यावेळी केंद्र सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाच्या निमित्ताने या सलामीला मोठे स्वरुप देण्यात आले आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात वायूदल, नौदल आणि लष्कराची तब्बल ७५ लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी होणार आहेत. १९७१ च्या पाकिस्तानवरील विजयाला ५० वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्तानेही संरक्षण दल जगाला देशाची हवाई ताकद दाखवण्याचा एक प्रकारे प्रयत्न करणार आहे.
विविध १५ रचना साकारत ( formation ) संरक्षण दलातील लढाऊ विमाने, मालवाहू विमाने, हेलिकॉप्टर, लढाऊ हेलिकॉप्टर हे सलामी देणार आहेत. या संचलनात एकुण आठ Mi-17 हेलिकॉप्टर, १४ ध्रुव हेलिकॉप्टर, एक CH- 47 हेलिकॉप्टर ( चीनूक ), एक Mi-35 लढाऊ हेलिकॉप्टर, चार AH-64 ( अपाची ) लढाऊ हेलि़कॉप्टर, दुसऱ्या महायुद्धातील विेंटेज मालवाहू विमान ‘डाकोटा’, नौदलाची दोन DO-228 डॉर्नियर गस्ती विमाने, तीन C-130 हर्क्युलस मालवाहू विमाने, आकाशातील डोळा म्हणून ओळखले जाणारे एक टेहळणी विमान ( AEW&C), वायुदलाचा कणा असलेली एकुण सात Su-30 लढाऊ विमाने, सात राफेल विमाने, तब्बल १९ Jaguar लढाऊ विमाने, हवाई दलाची चार Mig-29 तर नौदलाची दोन Mig-29K आणि नौदलाचे एक टेहळणी विमान P-8i अशी एकुण ७५ विमाने, हेलिकॉप्टर यांचा सहभाग असणार आहे.
संचलनाची सुरुवात होण्याआधी चार Mi-17 हेलिकॉप्टर हे ‘ध्वज’ रचना साकारत सलामी देणार आहेत. ही सलामी देतांना पहिल्या हेलिकॉप्टरकडे तिरंगा असेल तर उर्वरीत तीन हेलिकॉप्टर हे नौदल, वायुदल आणि लष्कर यांचे ध्वज फडकवतांना बघायला मिळतील. तर संचलनाच्या शेवटी सलामी देतांना १७ Jaguar लढाऊ विमानांच्या गर्जना राजपथाच्या आकाशात घुमणार आहे.
विशेष म्हणजे स्वदेशी बनावटीचे, जगातील सर्वात लहान लढाऊ विमान अशी ओळख असलेल्या ‘तेजस’चा या संचलनात सहभाग नसेल. तसंच वायूलदलातील सर्वात मोठी मालवाहू विमाने C-17 आणि IL-76 यांचाही सहभाग संचलनात नसेल. असं असलं तरी एवढ्या मोठ्या संख्येने लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर यांचा सहभाग बघता राजपथावरील शानदार असा संचलन सोहळा यावर्षी आणखी आकर्षक असेल यात शंका नाही.