बिहार निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींनी आता तरी परदेश दौरे बंद करून देशातील शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची परिस्थिती काय आहे, यामध्ये लक्ष घालावे, असा टोला राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत जदयु, राजद आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीला मतदारांनी स्पष्ट बहुमत मिळवून दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले, भाजप सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष झाले आहे. आता तरी मोदींनी आणि त्यांच्या इतर नेत्यांनी प्रचाराच्या मनःस्थितीतून बाहेर पडून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे. लोकांनी तुम्हाला काम करण्यासाठी निवडून दिले आहे. तेव्हा आता गाडीचा अॅक्सेलेटर वाढवा आणि काम करा. काम केले नाही तर देशातील जनता तुम्हाला गाडीतून बाहेर फेकायला कमी करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मोदी लंडन, अमेरिका, चीन या देशांचे सारखे दौरे करत आहेत. त्यांनी आता परदेश दौरे बंद करून देशातील शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

Story img Loader