पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण काहीजण यातही व्यवसायाची संधी शोधत आहेत. अशीच एक संधी मुंबईतील एका व्यापाऱ्याने शोधली असून, त्याने सध्या सातत्याने चर्चेत असणाऱ्या मोदींच्या प्रतिमेचा फायदा घेण्यासाठी पुन्हा एकदा मोदी साडी मुंबईतील बाजारात आणली आहे. या साडीला मुंबईसह इतरही ठिकाणाहून मागणी येऊ लागली आहे.
लग्नसराईच्या दिवसांना आता सुरुवात झाली आहे. बाजारात शालू, पैठणी यासारख्या भरजरी साड्यांना लोक पसंती देत आहेत.
शनमध्ये आलेले नवनवे ट्रेण्ड पाहता लग्नसराईला अनुसरुन काही नवीन डिझाइन्स बाजारात आल्या आहेत. त्यातलेच काही डिझाइन्स आलेले असताना साड्यांमधील डिझाइन्स पाहता त्यातही राजकारणाचा टच दिसून येतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या साड्या बाजारात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे फॅशन जगतातही नरेंद्र मोदींची लाट आलेली दिसतेय. दादरमधील एका दुकानात नरेंद्र मोदींचे फोटो प्रिन्ट असलेल्या साड्या विक्रीसाठी आल्या आहेत. या दुकानाचे मालक विनोदभाई यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी ही साडी बाजारात आणली होती. त्यानंतर आम्ही या साड्यांची विक्री बंद केली. पण, महिन्याभरापूर्वी मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे मग आम्ही त्या अनुषंगाने पुन्हा एकदा ही साडी बाजारात आणायचे ठरवले. या साडीची किंमत ५०० पासून ते ९५० रुपयापर्यंत आहे. तशी ही साडी फॅशन म्हणून नेसण्यासारखी नसली तरी केवळ आपल्या पंतप्रधानांची प्रिन्ट असलेलेी साडी आपल्याकडे जतन करून ठेवण्यासाठी स्त्रिया या साड्या घेत असल्याचे त्यांनी म्हटले. आतापर्यंत यातील २६०० साड्यांची विक्री झालेली आहे.