संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धोक्याचा इशारा

पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याला मानवाची कृत्येच कारणीभूत आहेत, पण यातून सरतेशेवटी माणसाचेच नुकसान होणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या स्टेट ऑफ नेचर या मूल्यमापनात म्हटले आहे.

माणसांनी वने, महासागर, जमीन, हवा हे सगळेच धोक्यात आणले असून हवामान बदलांइतकाच हा धोका महत्त्वाचा आहे असे १३२ देशांच्या साडेचारशे तज्ञांच्या बैठकीचे अध्यक्ष रॉबर्ट वॉटसन यांनी सांगितले.

येत्या दहा वर्षांत किमान १ लाख प्राणी व वनस्पती नष्ट होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

गेल्या १० दशलक्ष वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टीची जेवढी हानी झाली नाही त्यापेक्षा दहा ते शंभर पट वेगाने हानी आता सुरू आहे. त्यामुळे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनॉसॉर्स मेले होते त्यानंतरची ही सर्वात मोठी हानी असणार आहे. ज्या पद्धतीने आपण उत्पादन करतो, वापरतो, त्या सर्व घटकांमध्ये स्थित्यंतरात्मक बदल केला नाही तर हे नष्टचर्य सुरूच राहील.

हेल्महोल्त्झ सेंटर फॉर एनव्हरॉनमेंटल रीसर्च या जर्मनीतील संस्थेचे प्राध्यापक जोसेफ सेटेली यांनी सांगितले की, नजीकच्या काळात माणसाचे अस्तित्व धोक्यात येणार नाही हे खरे असले तरी कालांतराने ते धोक्यात येऊ शकते. या सगळ्यातून आपण अर्थव्यवस्था, उपजीविका, अन्न सुरक्षा, आरोग्य, जीवनाचा दर्जा याचा पायाच खिळखिळा करून टाकत आहोत.

दरवर्षी इंग्लंडच्या आकाराइतके जंगल कापले जाते त्यामुळे कार्बन डायॉक्साइड वाढत आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, रशिया, पोर्तुगाल, कॅलिफोर्निया व ग्रीस या देशात वणवे लागत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.

अधिवास नष्ट होणे, अन्न व व्यापारासाठी शिकार या कारणांमुळे प्रजाती धोक्यात येत आहेत. माशांचे प्रमाण घटत चालले आहे. प्रदूषणामुळे ४०० दशलक्ष टन जड धातू व विष महासागर व नद्यात दरवर्षी सोडले जात आहेत. जगातील वाढती लोकसंख्या व ते वापरत असलेल्या वस्तू व अन्न ही दोन कारणेही जैवविविधता नष्ट होण्यास कारणीभूत आहेत.

अहवालात काय?

संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केलेला अहवाल १८०० पानांचा असून त्यात १५ हजार स्रोतांचा वापर करण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्येही एका अहवालात हवामान विज्ञान समितीने म्हटले होते की, सामाजिक स्थित्यंतरे झाल्याशिवाय तापमान वाढ १.५ अंशांच्या टप्प्यात ठेवणे शक्य नाही. आधीच तापमान वाढ १ अंश सेल्सियस झाली असून शतकअखेरीस ती ३ अंशांनी वाढणार आहे.