फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला संस्थेतील विद्यार्थ्यांचा असलेला विरोध गुरुवारी पुन्हा एकदा उफाळून आला. नियुक्तीनंतर नियामक मंडळाच्या बैठकीसाठी चौहान पहिल्यांदाच संस्थेमध्ये आले. ते येण्यापूर्वी गुरुवारी सकाळपासून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. ‘चौहान गो बॅक’ ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या. तसेच निषेधाचे फलकही दाखविण्यात आले. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्या २५ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. चौहान यांच्या उपस्थितीत नियामक मंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली असून, संस्थेच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चौहान यांच्या नियुक्तीसह संचालक मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या अनघा घैसास, राहुल सोलापूरकर, नरेंद्र पाठक, शैलेश गुप्ता यांना विरोध करत संस्थेतील विद्यार्थ्यांनी जूनमध्ये पुकारलेला संप १३९ दिवस सुरू होता. ‘या व्यक्ती सक्षम नसून, त्यांच्या नियुक्त्या राजकीय हेतूने झाल्या आहेत,’ असा मुद्दा मांडून आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. संपावर तोडगा न निघताच तो मागे घ्यावा लागल्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत. संप मागे घेतला असला तरी निषेध नोंदवणे सुरूच ठेवणार असल्याचे एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचा एफटीआयआय सोसायटीत समावेश असण्यालाही विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. यापूर्वी संपकाळात एफटीआयआयच्या १७ आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला होता.
‘७ व ८ जानेवारीला चौहान व संस्थेच्या संचालक मंडळाचे इतर सदस्य संस्थेस भेट देणार असून, या काळात विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर कृत्य घडले तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल,’ अशी नोटीस डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी या विद्यार्थ्यांना बुधवारी बजावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा