काबूल विमानतळानजीक एका आत्मघाती हल्लेखोराने नाटो वाहनांवरील हल्ल्यात स्फोटके उडवून दिली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांच्या अफगाणिस्तान भेटीनंतर लगेचच तालिबानने हा हल्ला केला आहे. यात एक नागरिक ठार व इतर चार जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान सरकार व तालिबान यांच्यात शांतता चर्चा सुरू होण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राहील शरीफ एक दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. आज सकाळी झालेल्या हल्ल्यात चार नागरिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानातील सुरक्षा स्थिती बिघडली असून तालिबानने देशपातळीवर हल्ले वाढवले आहेत.
काबूल विमानतळानजीक हा बॉम्बहल्ला करण्यात आला, आम्ही आता त्याचा तपशील घेत आहोत, असे पोलिस उपप्रमुख गुल आगा रोहानी यांनी म्हटले आहे. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते सेदिक सिदीक्की यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की यात एक नागरिक ठार तर इतर चार जण जखमी झाले आहेत.
तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सांगितले, की परदेशी सैन्य दलांच्या वाहनांच्या काफिल्यावर दहशतवाद्यांनीच हल्ला केला असून त्यात अनेक परदेशी सैनिक ठार व अनेक जण जखमी झाले आहेत.
तालिबानला नेहमीच हानीबाबत अतिरंजित दावे करण्याची सवय असून नाटोने एका निवेदनात म्हटले आहे, की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्या काबूल दौऱ्यानंतर हा हल्ला झाला असून तालिबानबरोबर शांतता चर्चा सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, अमेरिका व चीन यांच्यात शांतता प्रयत्नांसाठी पहिली बैठक जानेवारीत होईल, असे अध्यक्षीय प्रासादातून सांगण्यात आले. चार देशांसमवेत चर्चेच्या या प्रस्तावावर तालिबानने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा