Tesla Cybertruck explodes outside Trump hotel watch VIDEO : अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगास येथील हॉटेलच्या बाहेर बुधवारी सायबर ट्रकचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. फटाके वाहून नेत असताना टेस्ला सायबर ट्रकला आग लागली आणि त्याचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्फोट झालेल्या वाहनाच्या मागच्या बाजूला फायरवर्क मोर्टार आणि कॅम्प फ्युअल कॅनिस्टर भरल्याचे आढळून आले आहे. यानंतर दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा कसून तपास केला जात आहे. यापूर्वी अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्समध्ये गर्दीत ट्रक घुसवल्याच्या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास केला जात आहे. या घटनेच्या काही तासांतच सायबर ट्रकचा स्फोट झाला आहे.

लास व्हेगास मेट्रोपोलिटन पोलीस आणि क्लार्क काउंटी फायर डिपार्टमेंट अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, या ट्रकमध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा जवळपास उपस्थित इतर सात लोकांना किरकोळ दुखापती झाल्या असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल लास वेगासच्या वॅलेट परिसरात सकाळी ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची माहिती काउंटीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात दिली.

अधिकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर ट्रक हा टुरो (Turo) अॅपद्वारे भाडाने घेण्यात आला होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके भरलेले होते.

स्फोट कसा झाला?

सायबर ट्रक बनवणाऱ्या टेस्ला या कार कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी बुधवारी दुपारी एक्स वर माहिती दिली की, “भाड्याने घेतलेल्या सायबर ट्रकमध्ये झालेला स्फोट हा प्रचंड प्रमाणात फटाके आणि/किंवा बॉम्ब गाडीत ठेवल्यामुळे झाल्याची पुष्टी आम्ही केली आहे. स्पोटाचा वाहनाशी कुठलाही संबंध नाही. स्फोटाच्या वेळी वाहनाची सर्व टेलीमेट्री सकारात्मक होती”.

हेही वाचा>> अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोरांनी सुरू केला गोळीबार

“टेस्लामधील वरिष्ठांची एक संपूर्ण टीम या प्रकरणाचा तपास करत आहे, आम्ही असा प्रकार यापूर्वी कधीच पाहिला नाही”, अशी प्रतिक्रिया देखील मस्क यांनी त्यांच्या एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये दिली आहे.

दरम्यान तपास यंत्रणांनी यामध्ये दहशतवादाचा हेतू असल्याची शक्यता फेटाळलेली नाही, अशी माहिती या प्रकरणाबद्दल माहिती असलेल्या एका सूत्राने दिली. संबंधित व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. कारण त्यांना तपासाच्या तपशीलांबद्दल जाहीरपणे बोलण्याचा अधिकार नव्हता.

“मला माहिती आहे तुम्हाला अनेक प्रश्न पडले आहेत, पण आमच्याकडे पुरेशी उत्तरे नाहीत”, अशी प्रतिक्रिया एफबीआयच्या लास वेगास कार्यालयाचे प्रभारी स्पेशल एजंट जेरेमी श्वार्ट्झ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी बनवलेल्या एका टेस्ला चार्जिंग स्टेशन्सवर रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओमुळे तपास अधिकाऱ्यांना या वाहनाच्या प्रवासाचा मागोवा घेण्यात मदत झाली. हा सायबर ट्रक लास व्हेगसमध्ये सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आला. त्यानंतर सुमारे तासभर चालवल्यानंतर तो ट्रक ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या वॅलेट परिसरात आला आणि तिथे १० ते २० सेकंद थांबल्यानंतर स्फोट झाला. दरम्यान या टेस्ला सायबरट्रक स्फोटाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियामध्ये तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One died after tesla cybertruck explodes outside trump hotel in las vegas video goes viral rak