कर्मचारी निवड आयोगाची माहिती
सन २०१३-१४ या वर्षांत देशात सुमारे एक लाख नवी पदे भरण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष एन. के. रघुपथी यांनी गुरुवारी दिली.
या वर्षभरात जेवढय़ा पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती, ती बहुतांश पदे भरण्यात आली आहेत. तसेच पुढील वर्षांत आणखी एक लाख नवीन जागा भरण्यात येणार आहेत.
कर्मचारी निवड आयोगातर्फे भारतीय अन्न महामंडळ, प्रसार भारतीसारख्या सरकारी संस्थांसाठीही नोकर भरतीची प्रक्रिया पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या स्पर्धा मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुढील वर्षांत १.५ कोटी नोकरीचे अर्ज येण्याची शक्यता असून एका पदासाठी १०२ अर्ज असे परिमाण असेल, अशी शक्यताही रघुपथी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
येत्या १५ डिसेंबर रोजी कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात शिपाई पदासाठी २२ हजार जागा भरण्यात येणार असून त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.  
दरम्यान, देशात दहशतवादी कारवायांचा सामना करणाऱ्या जिल्ह्य़ांमध्येही मोठय़ा प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरतीप्रक्रियेदरम्यान त्या त्या जिल्ह्य़ांतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शिवाय सीमेलगतच्या जिल्ह्य़ांमधील उमेदवारांनाही नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याचे रघुपती यांनी सांगितले.

Story img Loader