मंगळावर जाण्यासाठी मार्सवन प्रकल्पांतर्गत जी नावनोंदणी सुरू आहे त्याअंतर्गत आतापर्यंत एक लाख लोकांनी मंगळावर जाण्याची तयारी दर्शवली आहे. अब्जावधी डॉलर्सचा हा प्रकल्प असून तो २०२२ मध्ये अमलात येणार आहे. या योजनेत इच्छुकांना मंगळावर सोडले जाईल, पण परत आणले जाणार नाही. मंगळावर माणसे कशी जगू शकतील याबाबत अजून शंका असतानाही मार्सवन प्रकल्पांतर्गत मोठय़ा प्रमाणात नावनोंदणी झाली आहे. मार्सवनचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या बॅस लॅन्सडॉर्प यांनी सांगितले, की अजूनही अनेक लोकांनी त्यांची माहिती पूर्ण स्वरूपात भरलेली नाही याचा अर्थ त्यांना अर्जाचे शुल्क भरण्याची क्षमता नाही असे दिसते किंवा ते या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली त्यांची व्हिडिओ तयार करीत असावेत. त्यामुळे यात जे लोक ऑनलाइन दिसत आहेत तेच खऱ्या अर्थाने मंगळावर जाण्यास तयार आहेत असा अर्थ निघतो.
नेमके किती लोकांनी मंगळावर जाण्यासाठी हे शुल्क भरले आहे, कितीजणांनी त्यांची माहिती भरून पूर्ण केली आहे. कितीजणांनी ती जाहीर केलेली नाही, याबाबत नेमकी माहिती लॅन्सडॉर्प यांनी म्हटले आहे. वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती किंवा त्या वयापुढील कुठल्याही देशाची व्यक्ती मंगळावर जाण्यासाठी अर्ज करू शकते. अमेरिकी नागरिकांसाठी त्याचे शुल्क ३८ अमेरिकी डॉलर आहे.
प्रत्येक देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या आधारे मंगळावर जाण्याचे शुल्क निर्धारित केले आहे असे कंपनीने म्हटले आहे. जास्तीत जास्त लोकांनी नावे नोंदवावीत अशी आमची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे मंगळावर जाणे सर्वाना परवडू शकेल असे लॅन्सडॉर्प यांनी सांगितले. पहिल्या फेरीत ६ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च करून इच्छुकांपैकी काहींना मंगळावर पाठवले जाणार असून, मंगळावर जाणाऱ्या अंतराळवीरांचे प्रशिक्षण व नंतरचे मंगळावतरण यासारख्या घडामोडीच्या काही चित्रफितींचे हक्क सार्वजनिक प्रसारणासाठी विकून त्यातून मोहिमेसाठी पैसा उभा केला जाणार आहे. अंतराळ प्रवासातील धोके लक्षात घेतले तरी हा प्रकल्प यशस्वी होईल असे मत लॅन्सडॉर्प यांनी व्यक्त केले. मानवाने इतके अंतर अंतराळात कधीच कापले नसून ही मोहीम आव्हानात्मक आहे यात शंका नाही असे त्यांनी म्हटले आहे.
मंगळ मोहिमेची पूर्वतयारी
मंगळावर जाण्यासाठी पहिला बहुराष्ट्रीय गट या वर्षी निवडला जाणार असून, त्यात ४० अंतराळवीर असतील. त्यातील चौघांना सप्टेंबर २०२२ मध्ये मंगळाकडे रवाना केले जाईल, त्यात दोन पुरुष व दोन महिला असतील. ते एप्रिल २०२३मध्ये मंगळावर उतरतील. त्यानंतर दोन वर्षांनी चारजणांचा दुसरा गट पाठवला जाईल, त्यांच्यापैकी कुणालाही पृथ्वीवर परत आणले जाणार नाही. अंतराळवीरांना मंगळवारीसाठी आठ वर्षे प्रशिक्षण दिले जाणार असून मंगळावरची घरे कशी दुरुस्त करावी, तेथे भाजीपाला लागवड कशी करावी, दातांची व स्नायूंची काळजी कशी घ्यावी हे शिकवले जाणार आहे. प्रत्येक लँडरबरोबर ५५११ पौंड वजन मंगळावर पाठवता येईल.