लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात भाजपा पक्षांतर्गतही नाराजी दिसून येतेय. भाजपा खासदार वरूण गांधी यांच्यानंतर आणखी एका भाजपा नेत्यानं या प्रकरणावरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर तोफ डागलीय. भाजपाचे नेते आणि माजी आमदार राम इकबाल सिंह यांनी अजय मिश्रा हेच लखीमपूर हिंसाचाराचा कट रचणारे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिश्रा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केलीय.
राम इकबाल सिंह उत्तर प्रदेश भाजपाच्या कार्यकारणीचे सदस्यही आहेत. ते म्हणाले, “लखीमपूर हिंसाचारात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा दोषी आहेत. या हिंसाचाराआधी मिश्रा यांनी दिलेल्या भडकाऊ वक्तव्यानेच आगीत तेलाचं काम केलं. त्यांनी खरंतर शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मात्र, ते स्वतःच्या मुलाला वाचवण्याचं काम करत आहेत. त्यांना या हिंसाचारावर जरासाही पश्चाताप नाहीये.”
“गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं, मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं”
“गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलंय. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर त्याला अटक झालीय. मात्र, अजय मिश्रा आजही केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कायम आहेत. अशावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे. मागील काही दिवसात झालेली लखीमपूर हिंसाचाराची घटना आणि गोरखपूरमधील व्यापाऱ्याच्या हत्येनं पक्षाची बदनामी झालीय.”