जरात दंगलीमुळे जागतिक पातळीवर आपल्या प्रतिमेला लागलेला कलंक पुसण्यासाठी आतुर असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सोमवारी आणखी एक धक्का बसला. अमेरिकेतील ‘व्हॉटरेन’ या बिझनेस स्कूलमध्ये होत असलेल्या आर्थिक परिसंवादामध्ये ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे आयोजित करण्यात आलेले मोदींचे भाषण रद्द करण्याची वेळ आयोजकांवर ओढवली. व्हॉटरेनमधील काही प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांबरोबरच पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या भारतीय-अमेरिकन प्राध्यापकांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे मोदींचे भाषण रद्द करावे लागले.
पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या व्हॉटरेन स्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे दरवर्षी भारतावर आधारित आर्थिक परिसंवादाचे आयोजन करण्यात येते. अनेक नामांकित वक्ते यात सहभागी होत असल्याने या परिसंवादाला चांगलेच वलय आहे. यंदा २३ मार्च रोजी होणाऱ्या या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी ‘व्हॉटरेन इकॉनॉमिक फोरम’च्या आयोजकांनी मोदी यांना निमंत्रण दिले होते. मात्र, मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला असल्याने मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या परिसंवादात सहभागी होणार होते.
मात्र, व्हॉटरेनमधीलच काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोदींच्या भाषणास कडाडून विरोध केला. ‘गुजरातमधील दंगलींदरम्यान मुस्लिमांच्या झालेल्या हत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मोदींनी काहीही केलेले नाही. याच आधारावर १८ मार्च २००५मध्ये अमेरिकेने त्यांना व्हिसाही नाकारला होता. अशा व्यक्तीला परिसंवादात निमंत्रण देणे चुकीचे आहे,’असे पत्र या प्राध्यापकांनी फोरमला लिहिले. याशिवाय पेन्सिल्वानिया विद्यापीठातील तुरजू घोष, अनिया लांबा आणि सुविर कौल या तीन भारतीय-अमेरिकन प्राध्यापकांनीही मोदींविरोधात मोहीम छेडली.
‘अल्पसंख्याकांचे नियोजनपूर्वक खच्चीकरण करून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदींना भाषणासाठी बोलावणे अत्यंत आश्चर्यजनक आहे. आर्थिक धोरणे व मानवाधिकार यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे मोदी आणि त्यांचे समर्थक सिद्ध करू पाहतात. मात्र हे चुकीचे आहे. म्हणूनच मोदी यांच्या भाषणास आमचा विरोध आहे. त्यांना सहभागी करून घेतल्यास आम्ही आमच्या पद्धतीने त्याला विरोध करू,’ असे पत्र या तिघांनी फोरमकडे पाठवले. या पत्रावर सुमारे अडीचशे जणांनी स्वाक्षऱ्या करून त्यांना समर्थन दिले. या घडामोडींमुळे मोदींचे भाषणच रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला.
‘आमच्या या निर्णयामुळे व्हॉटरेन स्कूल व नरेंद्र मोदी यांना त्रास झाल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. मात्र मोदींना बोलावण्याचा निर्णय योग्य होता, असे अजूनही आमचे मत आहे. मोदी यांची कर्तबगारी, प्रशासकीय विचार आणि नेतृत्व यांचा आमच्या विद्यार्थी संस्थेवर चांगला प्रभाव पडल्यानेच भारताच्या ‘विकासगाथे’वर चर्चा करण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता.’ असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
अहलुवालियांना निमंत्रण?
मोदींचे भाषण रद्द झाल्याने त्यांच्या जागी भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांना परिसंवादात निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याची घोषणा अद्याप झालेली नाही. या परिसंवादात केंद्रीय दूरसंचार व तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलिंद देवरा, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर हे सहभागी होणार आहेत.

Story img Loader