एक्सप्रेस वृत्तसेवा लुधियाना (पंजाब) : पंजाबमध्ये ढोबळी मिरचीला किलोमागे एक रुपया दर मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मानसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. पंजाबमधील शेतकऱ्यांनी गहू-तांदूळ ही पारंपरिक पिके सोडून अन्य पिके घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले होते; पण सध्या मिळत असलेल्या दराने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. मानसा जिल्ह्यातील भाईनीबाघा गावातील शेतकरी गोरा सिंग म्हणाले, ‘‘मान सरकारने पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन केल्यानंतर मी पाच एकरात ढोबळी मिरचीची लागवड केली होती. १७ किलो मिरचीची प्लास्टिकची एक पिशवी व्यापाऱ्याला विकली, त्याने फक्त १५ रुपये माझ्या हातात टेकवले. प्रति किलो एक रुपयांहून कमी दर मिळाला. वाहतूक, तोडणीचा खर्च वेगळाच. शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रावर लागवडीसाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे.’’

तीन लाख हेक्टरवर भाजीपाला लागवड 

पंजाबमध्ये सुमारे तीन लाख हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. त्यात ढोबळी मिरचीची लागवड सुमारे १५०० हेक्टरवर करण्यात आली आहे. त्यातील संगरुरमध्ये ५००, फिरोजपूरमध्ये १०० आणि मानसामध्ये २५० हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती पंजाबच्या कृषी विभागाने दिली.

हवामान बदलाचा असाही फटका

  • महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रामुख्याने ढोबळी मिरचीचे उत्पादन होते.
  • जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील आणि मार्च-एप्रिलमध्ये पंजाबमधील मिरची काढणीला येते.
  • पण यंदा थंडीचे दिवस कमी होणे, अवकाळी पाऊस आणि तापमान वाढ, अशा विविध कारणांमुळे ढोबळी मिरचीची काढणी एकाच वेळी सुरू झाली.
  • त्यामुळे मिरचीची बाजारातील उपलब्धता वाढून, दर कोसळले आहेत, अशी माहिती पंजाबच्या फलोत्पादन विभागाचे संचालक शैलेंद्र कौर यांनी दिली.

एक एकर क्षेत्रावर ढोबळी मिरची लागवडीसाठी सरासरी एक लाख रुपये खर्च केला आहे. आता प्रति किलो एक रुपयाही दर मिळत नाही. राज्याबाहेर ढोबळी मिरची विकण्यासाठी सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी.

– सुखदेव सिंग, शेतकरी, कोटली कलान (जि. मानसा )

Story img Loader