पॅरिस दहशतवादी हल्लाप्रकरणी बेल्जियममध्ये चौघे ताब्यात
फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे शुक्रवारी आयसिसच्या दहशतवाद्यांनी रक्तपात करीत १२९ जणांना ठार केल्यानंतर आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरच हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या हल्लेखोराला अटक केली असून, त्याचे नाव ओमर इस्माईल मोस्तेफाय असे आहे. तो २९ वर्षांचा असून त्याचे एक बोट तुटलेले आहे. बटाक्लान येथील संगीत मैफल कक्षात त्याने हल्ला केला होता. आयसिसच्या जिहादींनी आम्हीच हा हल्ला केला असे सांगितले आहे. रेस्टॉरंट, बार व नॅशनल स्टेडियममध्ये हे हल्ले एकाच वेळी करण्यात आले होते. त्यात काही आत्मघाती हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट केले, तर काहींनी एके ४७ रायफलीतून गोळीबार केला होता.
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी सांगितले, की हा हल्ला म्हणजे देशाविरोधातील युद्ध होते व शार्ली हेब्दोच्या हल्ल्यानंतर दहा महिन्यांनी पॅरिसमधील गर्दीच्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. दरम्यान, पळालेल्या काही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी युरोपात पाश आवळण्यात आले असून, बेल्जियमच्या पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली आहे. जर्मन अधिकाऱ्यांनी तेथील एका व्यक्तीच्या मोटारीत स्फोटके सापडल्यानंतर त्याचा हल्ल्याशी संबंध तपासण्यास सुरुवात केली आहे. एका हल्लेखोराच्या मृतदेहाजवळ सीरियन पासपोर्ट सापडला असून, काही हल्लेखोर युरोपात पळाल्याचा संशय आहे.
सीरियातील यादवी युद्धामुळे अनेक लोक युरोपात शरणार्थी म्हणून जात आहेत, त्याचा फायदा त्यांनी घेतला असावा. सीरियाचा पासपोर्ट ज्याच्याकडे होता तो ग्रीसमधील लेरॉस बेटांवरून आला होता. तो ग्रीसमध्ये ३ ऑक्टोबरला पोहोचला असावा असे ग्रीसचे नागरिक संरक्षणमंत्री निकॉस टोसकास यांनी सांगितले. बटक्लान येथील संगीत मैफलीच्या आसपास ८९ जण मारले गेले. आयसिसच्या हल्ले पद्धतीत बदल झाला असून पश्चिमेत आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे असे युरेशिया समूहाने सांगितले. बेल्जियमच्या पोलिसांनी ज्या संशयितांना ब्रसेल्स येथे अटक केली, त्यातील एक जण या हल्ल्याच्या वेळी पॅरिसमध्ये होता.
जो हल्लेखोर पकडला गेला आहे तो मोस्तेफाय हा पॅरिसच्या कोरकॉरोनेस या उपनगरात जन्मलेला असून, त्याला चार भाऊ व दोन बहिणी आहेत. त्याच्यावर आठ किरकोळ गुन्हय़ांत तपास सुरू होता, पण त्याला कधी तुरुंगवास झालेला नव्हता. बटाक्लान येथे जे बोटांचे ठसे सापडले ते त्याच्या हाताशी जुळणारे आहेत. २०१० मध्ये त्याला मूलतत्त्ववाद्यांनी जिहादची शिकवण दिली होती, पण तो कधी दहशतवादी कारवायात सामील नव्हता असे अभियोक्ते फ्रँकॉइस मोलिन्स यांनी सांगितले. त्याच्या वडील व भावालाही कोठडीत टाकण्यात आले आहे.