जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती मिळत आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. शोध मोहीम अजूनही सुरू आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे.
काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानच्या झैनापोरा भागातील चेरमर्गमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. या भागात किती दहशतवादी लपलेले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु सुरक्षा दलांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला असून, सखोल तपास मोहीम राबवली जात आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याचीही माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना चेरमार्ग, झैनापोरा येथे दहशतवादी दिसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर एसओजी, आर्मी आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी शोधमोहीम राबवली. सुरक्षा दलांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि एका दहशतवाद्याला ठार केले. सुरक्षा दलांवर दहशतवादी सतत गोळीबार करत आहेत. सध्या चकमक सुरू आहे.