काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेरा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर गंभीर आरोप केले. रविवारी (दि. ५ मे) त्यांनी काँग्रेसच्या सदस्यदाचा राजीनामा दिला असल्याचेही जाहीर केले. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, मी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊन आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी माझा छळ सुरू केला. मंदिर भेटीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याबद्दलही काँग्रेस नेत्यांनी मला फटकारले, असेही त्या म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खेरा म्हणाल्या की, निवडणूक काळात राम मंदिराला भेट देऊ नका, असे पक्षाने मला बजावले होते. काँग्रेस राम विरोधी, सनातन विरोधी आणि हिंदू विरोधी आहे, हे मी आजवर ऐकत आले होते. मात्र मला त्यावर विश्वास बसत नव्हता. महात्मा गांधी हे ‘रघुपती राघव राजा राम’ असे बोलून बैठकीची सुरुवात करायचे. मी माझ्या आजीबरोबर अयोध्येत जाऊन आल्यानंतर माझ्या घरावर जय श्री राम लिहिलेला झेंडा लावला त्यानंतर काँग्रेस पक्षाने मला वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली. मी जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर माझे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत असे, तेव्हा तेव्हा काँग्रेसकडून मला दमबाजी करण्यात यायची. निवडणूक प्रक्रिया सुरू असून हे फोटो टाकण्याची गरज नाही, असे मला सांगितले जात असे.

पाकिस्ताननं हातात बांगड्या भरल्या नसून त्यांच्याकडे अणूबाँब आहेत; फारुक अब्दुल्ला

मला मद्य पिण्यास विचारले गेले

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत मी सहभागी झाले होते. त्यावेळी यात्रा छत्तीसगड राज्यात पोहोचल्यानंतर काँग्रेस नेते सुशील आनंद शुक्ला यांनी मला मद्य पिण्याची ऑफर दिली होती. तसेच रात्री नशेत चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन ते माझे दार वाजवत होते, असा खळबळजन आरोपही खेरा यांनी केला आहे. माझ्या छळाबाबत मी सचिन पायलट आणि जयराम रमेश यांनाही माहिती दिली होती, तरीही काहीही कारवाई करण्यात आली नाही. पक्षाच्या हिंदू विरोधी विचारात मी बसत नसल्यामुळे माझा छळ करण्यात आला, असाही आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींच्या यात्रेवरही टीका

राधिका खेरा यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही टीका केली. त्या म्हणाल्या, भारत जोडो यात्रेत राहुल गांधी कुणालाही भेटत नसत. ते फक्त गर्दी असताना पाच मिनिटांसाठी बाहेर यायचे आणि नंतर आपल्या गाडीत जाऊन बसायचे. मी तीन वर्षांपासून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. पण अद्याप मला भेटण्याची वेळ देण्यात आली नाही.

छत्तीसगडमध्ये भारत जोडो यात्रेमध्ये जे काही झाले, त्याबद्दल सचिन पायलट यांना सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माझा कॉल घेतला नाही. तसेच त्यांच्या पीएकडून मला निरोप देण्यात आला की, मी माझे तोंड बंद ठेवावे. मी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही छत्तीसगडमध्ये जे झाले, ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण मला राज्यातून बाहेर जाण्यास सांगितले गेले.

राधिका खेरा यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींवर आरोप केले. छत्तीसगड प्रकरणानंतर माझ्याबरोबर न्याय झाला नाही. एक राम भक्त आणि महिला या नात्याने पक्षात मला काहीही मदत मिळू शकली नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ongress former spokesperson radhika khera on alleged harassment by congress leader kvg