कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथील एका शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षापासून अर्धनग्न अवस्थेत राहून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकच्या सभेत जाण्यापासूनही त्यांना पोलिसांनी रोखल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कृष्णा डोंगरे असं या पीडित शेतकऱ्याचं नाव असून ते सध्या अर्धनग्न अवस्थेत वावरत आहेत. कांद्याला भाव मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. नाशिकमध्ये मोदींची सभा झाली या सभेत त्यांना सहभागी होता आले नाही, कारण पोलिसांनी त्यांना आधल्या रात्रीच ताब्यात घेतले आणि दुसऱ्या दिवशी मोदींची सभा संपल्यानंतर सुटका केल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या आणि सरकारच्या या कृतीचा डोंगरे यांनी निषेध केला असून सरकार शेतकऱ्यांना इतक का घाबरतयं? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

मी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर येवल्याच्या पोलीस निरिक्षकांनी माझ्या नावाची हद्दपारीची नोटीस काढली. पोलीस खून, बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपींना संरक्षण देता आणि गरीबावर अन्याय करता असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आपल्याला धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एका पोलिसाने आपल्याला तुझं आंदोलन मोडीत काढतो, तुला आणि तुझ्या घरच्यांना संपवू अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोपही डोंगरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना या प्रकाराची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

आता पुढील सहा महिन्यांत विधानसभेसाठी मतदान केल्यानंतरच अंगावर कपडे घालीन असा निर्धार त्यांनी केला आहे.

Story img Loader