अहमदाबाद : ‘‘ठोस विचार नसलेला राजकीय पक्ष संघासमोर उभा राहून वैचारिक लढा देऊ शकत नाही. काँग्रेसकडे वैचारिक स्पष्टता आहे, संघाविरोधात फक्त काँग्रेस लढा देऊ शकतो. संविधानाच्या रक्षणासाठी संघ व भाजपविरोधातील लढाई कायम राहील आणि हे काम काँग्रेसलाच करावे लागेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या लढाईसाठी तयार राहिले पाहिजे,’’ असा सल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते व पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अखेरच्या सत्रात दिला.
अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, ‘‘संघ व भाजपविरोधात लढण्यासाठी विचार, आचार आणि प्रचाराची गरज आहे. काँग्रेसकडे विचार व आचार असून आता प्रचारावर भर दिला पाहिजे. शिवाय पक्षाकडे मनुष्यबळ, मानसिक बळ व आर्थिक बळ असावे लागते. काँग्रेसकडे बळ कमी असले तरी मनुष्यबळ व मानसिक बळ आहे. त्यामुळे काँग्रेस संघ व भाजपविरोधात लढू शकतो,’’ असा विश्वास व्यक्त केला.
संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा स्पष्ट करताना, राहुल गांधी यांनी वक्फ कायद्याला काँग्रेसचा विरोध असल्याचा पुनरुच्चार केला. नव्या वक्फ कायद्यामुळे धर्माच्या स्वांतत्र्यावर व संविधानावर हल्ला झाला आहे. मुस्लिमांनंतर ख्रिाश्चनांच्या जमिनी काढून घेतल्या जातील, असे संघविचाराच्या नियतकालिकात लिहिले होते. खरेतर शीख व इतर अल्पसंख्याकांच्या जमिनीही बळकावल्या जातील, असे राहुल गांधी म्हणाले. खरगे यांनीही वक्फच्या मुद्द्यावर काँग्रेस मुस्लिमांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना, ओबीसींना आरक्षण, अग्निवीर, अंबानी-अदानी, परराष्ट्र धोरण, अशा विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.