केंद्रातील आगामी सरकार हे तरुणांचे असेल आणि ते देशाचा कायापालट करेल, असा आशावाद कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील रामपूरमधील सभेत व्यक्त केला. देशातील मागासवर्गीयांना आणि गरिबांना सत्तेत सहभागी करून घेण्याचे आश्वासनही राहुल गांधी यांनी या सभेमध्ये दिले. 
आम्ही देशातील मागासवर्गीयांना आणि गरिबांना सत्ता मिळवून देऊन देशाचा कायापालट करू, असे सांगून ते म्हणाले, देशातील महिला याच देशाची खरी ताकद आहे. ज्या राज्यांनी महिलांच्या हाती सत्ता दिली, त्या राज्याची प्रगती झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्याआधी अलीगढमधील सभेत राहुल गांधी म्हणाले, जातीपातीच्या राजकारणावरून आजही लोकांमध्ये भांडणं लावली जात आहेत. एवढंच नव्हे तर राजकीय फायद्यासाठीच दंगली घडवून आणल्या जातात. दंगली घडवल्या नाहीत तर निवडणुका जिंकल्या जाऊ शकत नाहीत. या सभेत त्यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल चढवताना मुझफ्फरनगर दंगलीवरून अखिलेश सरकारला चांगलेच धारेवर धरले. एवढंच नव्हे तर, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशचा विकास करू शकत नाही, असंही ते म्हणाले.   
सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, रोजगार, अन्न आणि शिक्षणाचा अधिकार कॉंग्रेस पक्षाने सामान्य जनतेला दिला. संपूर्ण देशात सरकारतर्फे प्रत्येक कुटुंबाला ३५ किलो धान्य एक रूपये किलो दराने देण्यात येणार आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकार ही योजना या राज्यात लागू करणार नाही, कारण ते कॉंग्रेसला त्याचे श्रेय देऊ इच्छित नाहीत. 
राहुल गांधी पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशात कॉम्प्युटरचे सरकार, पण कॉम्प्युटर चालत नाही. वीज नाहिए पण आम्ही अधिकार असेललं सरकार येथे देऊ. आम्ही रोजगाराचा अधिकार दिला. ‘मनरेगा’मार्फत कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला. एवढंच नव्हे तर, भारतातील सर्वांना एक रुपये किलो दराने धान्य देणार आहोत, त्यामुळे तुमच्या मुलांना रोज भोजन मिळेल.
गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या वटहुकमाबाबत राहुल गांधी म्हणाले की, खरं बोलण्यासाठी वेळ बघावी लागते का? मी जे काही बोललो ते खोटे बोललो का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. 
उत्तर प्रदेशचा विकास बसपा आणि समाजवादी पक्षाकडून होणार नाही. हे काम फक्त कॉंग्रेस पक्षच करू शकतो. आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करून दाखवू. 
मुजफ्फरनगर दंगलीबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, या दंगलींमध्ये हिंदू-मुसलमान दोघेही मारले गेले आणि या दोन्हा समाजातील लोकांच्या मी भेटी घेतल्या. दोन्ही समाजातील लोकांनी हेच सांगितले कि, आमच्यामध्ये वैमनस्य नाही. हे सर्व राजकारण्यांनी घडवून आणलेलं आहे. काही लोक हिंदू आणि मुसलमान यांच्यात भांडणे लावू इच्छितात, आम्ही ही भांडणे होऊ देणार नाही. कांग्रेस जातीचे राजकारण करत नाही. इथे सर्वांना समान वागणूक दिली जाते, असंही गांधी पुढे म्हणाले.