देशभरात आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. कालच्या दर वाढीनंतर आज पुन्हा सरकारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर मागे ८० पैशांची तर, मुंबईत इंधन दरात ८५ पैशांची वाढ झाली आहे. दरम्यान या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे बुधवारी लोकसभेत म्हणाल्या, “सध्याची परिस्थिती पाहता केवळ निवडणुकाच इंधन दरवाढ रोखू शकतात. पेट्रोल, डिझेल, एलपीजीचे भाव वाढू नयेत, म्हणून दर महिन्याला निवडणुका घ्या, असा टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला.” जेव्हापर्यंत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या नव्हत्या, तोपर्यंत इंधनाचे स्थिर होते. मात्र, निकाल लागताच दरवाढ सुरू झाल्याची टीका विरोधकांकडून केंद्र सरकारवर होत आहे. मंगळवारी तर गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत.
Petrol-Diesel Price hike : देशभरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ
दरम्यान, या इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेतून सभात्याग केला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत इंधनाचे वाढलेले दर मागे घेण्याची मागणी करत सभागृहावर बहिष्कार टाकला.
देशात ४ नोव्हेंबर २०२१ पासून इंधनदर स्थिर होते. पण अलिकडे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने तोटा भरून काढण्यासाठी देशात इंधनदरात प्रतिलिटर १५ ते २० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े.