पीटीआय, हैदराबाद
तिरुमला तिरुपती देवस्थानात (टीटीडी) कार्यरत कर्मचारी हिंदू असायला हवे, असे सूतोवाच देवस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी पत्रपरिषदेत दिले. याबरोबरच अन्यधर्मीय कर्मचाऱ्यांना अन्य सरकारी विभागांत स्थानांतरित करणे अथवा त्यांना स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) देण्यासंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.
देवस्थानात सर्वच हिंदू कर्मचारी नियुक्त करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तथापि, त्यात अडथळेही आहेत. प्रत्येक मुद्द्यावर विचार करावा लागेल. यापूर्वीच्या वायएसआर काँग्रेसच्या काळात तिरुमलात अनेक घोटाळे झालेत. मंदिराचे पावित्र्य कायम राखावे लागेल, असे नायडू यावेळी म्हणाले. वेंकटेश्वर स्वामींचे भक्त असल्याने बोर्ड अध्यक्षपदी नियुक्ती होणे विशेषाधिकार असल्याची रीदेखील त्यांनी या वेळी ओढली. कर्तव्याचे पालन प्रामाणिकतेने आणि पारदर्शकतेने करणार असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा : न्यूयॉर्कमधील शाळांना पहिल्यांदाच दिवाळीची सुट्टी
२४ सदस्यांची समिती
आंध्र प्रदेश सरकारने २४ सदस्यांची एक समिती स्थापन केली असून ही समिती तिरुमलातील प्रसिद्ध बालाजी मंदिराचा कारभार पाहणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बी. आर. नायडू यांची नियुक्ती केली आहे. तर सदस्यांमध्ये भारत बायोटेक लिमिटेडच्या सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांचादेखील समावेश आहे.